बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )
🚩 बाजींद भाग - ७ ⚔️ ▶ त्या दिवशी दिवसभर “साऊ”ला काही सुचत नव्हते,सतत सकाळचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर तरळत होता. पण,राजे येसाजीरावांच्या एकुलत्या एक मुलीला असे विचार करणे शोभत नाही,म्हणून तिचे मन तिलाच समजावत होते.भावना आणि कर्तव्य यांचा मनात झालेला महापूर प्रथमच साऊ अनुभवत होती. इकडे, खंडेराय आणि त्याचे वस्ताद काकासाहेब मोठ्या गूढ चर्चेत व्यस्त होते..! ती चर्चा कोणती त्या दोघांनाच माहिती ..! एव्हाना तालमीत चीटपाखरू नव्हते..शिर्क्यांची शिबंदी येसाजीरावंच्या आदेशाना त्यांच्यासोबत घाटमाथ्यावर टेहळणी ला गेली होती,जेमतेम शे दोनशे धारकरी वाडा राखत होते. फौज टेहळणी करून यायला अजून बराच अवकाश होता. शिर्क्यांचा आजवर कोणी पाडाव करू शकले नाहीत याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे नेकजात,इमानदार मराठ्यांची फौज,त्यात कुस्तीचा प्रचंड नाद असलेले राजे एक एक माणूस तोलून मापून दिमतीस घेत असत ..! फंद फितुरीला स्थानच नव्हते. पण, त्या दिवशी……! शेजारच्या डोंगरातल्या दरोडेखोरांचा मोठा छापा यशवंतमाचीवर पडला…! खंडेराय आणि वस्ताद चर्चेत व्यस्त होते तितक्यात गावात दंगा-गोंगाट ऐकू येऊ लागला. दोघेही उठले…खु...