ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️ १० जानेवारी इ.स.१६२६
शहाजीराजे निजामशहाची नोकरी सोडून ते आदिलशाहीत सर लष्कर या पदावर रुजू झाले होते. या दोन शाह्यांतील युद्धांत त्यांनी आपला पुणे, परगणा व पाटसकडील मुलूख विजापुरी सैन्याच्या मदतीने प्रथम निजामशाहीकडून जिंकून आदिलशाहीकडे घेतला. शहाजी राजांना शिक्षा करण्याचे काम मलिकंबरने हाती घेऊन त्याजवर फौज पाठविली. आणि सालप्याचे घाटांत त्यांस कोंडीले. यावेळी त्यांस संभाजी मोहिते यांचे साहाय्य झाले. म्हणून संभाजींची शिफारस आदिलशाहाकडे करून शहाजीराजे यांनी त्यांस तळबीडची देशमुखी देवविली. (१० जानेवारी १६२६) या दरम्यान संभाजी मोहित्यांची बहीण तुकाबाई यांच्याशी शहाजी महाराजांचे लग्न झाले. (बेंद्रे, मालोजी आणि शहाजी महाराज, पृ. २४५.) त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होय.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ १० जानेवारी इ.स.१६६०
मराठ्यांचा व डचांचा संबंध शहाजीराजांच्या कर्नाटक मोहिमेतून निर्माण झाला. इ. स. १६५७ साली संद्रेम पाटण शहर शहाजीराजांनी घेतले त्यावेळी तेथील डच वखार शहाजीराजांच्या सैनिकांनी लुटली व स्वतःच्या ताब्यात ठेविली आणि नोकरांना कैद केले. १० जानेवारी १६६० रोजी शिवाजीराजेंनी राजापूर लुटले पण तेथे डच वखार नव्हती. १४ फेब्रुवारी १६६० रोजी नेमलेला वेंगुर्ल्याचा विजापुरी सुभेदार रुस्तुमजा हा डचांचा मित्र होता. असे असले तरी डच कंपनीने इंग्रज व पोर्तुगीज यांचेपुढे कशी बाजी मारली त्याचे वर्णन हेनरी रिव्हिंगटनच्या दिनांक १० डिसेंबर १६५९ च्या पत्रात मिळते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ १० जानेवारी इ.स.१६६४
(पौष वद्य अष्टमी शके १५८५ संवत्सर शोभन वार रविवार)
औरंगजेबास सुरत लुटीची बातमी कळली!
महाराजांनी भल्या पहाटे सुरत सोडली व परतीचा प्रवास वेगाने सुरू केला. महाराजांनी इ.स.१६६० ते इ.स.१६६३ पर्यंत शाहीस्तेखानाने स्वराज्यात केलेल्या नासाडीचा पुरेपूर बदला वसूल केला. सुरत लुट हा मोगली साम्राज्याचा फार मोठा अपमान होता. याच काळात हवापालटासाठी गेलेला औरंगजेब काश्मीरहून परतत असताना लाहौर मुक्कामी त्याला सुरत लुटीची ही कडू बातमी समजली. सगळे वर्तमान समजले. मोगली सरदारांच्या, किल्लेदारांच्या नाकर्तेपणाच्या सर्व बातम्या समजल्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा बदला घेतला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ १० जानेवारी इ.स.१६८४
(माघ शुद्ध चतुर्थी शके १६०५ संवत्सर रुधिरोद्रारी वार गुरूवार)
छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांचा वेढा उठविला!
पोर्तुगीज बेभान होऊन नाचले. धर्मांध पोर्तुगिजांच्या धर्मांधतेला छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय प्रखरपणे चाप लाऊन पोर्तुगिजांचे कंबरडेच मोडले. २६ दिवसात छत्रपती संभाजी महाराजांनी वेचून वेचून पोर्तुगिजांचा माज मोडला होता. कोंट द अल्वोरच्या बरगड्या मोडल्या होत्या. दारुगोळा संपला होता. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती. धार्मिक स्थळांची वाताहत झाली होती. अशातच छत्रपती संभाजी महाराजांना शहजादा मुअज्जमने गोव्याच्या दिशेने त्वरेने आगेकुच केली असल्याची खबर असल्याने छत्रपती संभाजी महाराजांनी वेगाने रातोरात वेढा उठवून पोर्तुगीज व मोगल यांच्या कोंडीत सापडण्यापुर्वीच कुच केले. मात्र मराठे, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा पुन्हा हल्ला करतील या भितीने गोवा राज्य सल्लागार मंडळाची बैठक होऊन पोर्तुगिजांनी आपली राजधानी पणजीहून मार्मागोवा (मुरगावचा) हलविण्याचा निर्णय घेतला होता. पण छत्रपती संभाजी महाराजांनी वेढा उठविला हे पाहताच पोर्तुगीज बेभान होऊन नाचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ १० जानेवारी इ.स.१७००
३० डिसेंबरला मराठ्यांविरुद्ध मोठ-मोठे सरदार पाठविण्यात आले. पण मराठे हाती लागले नाहीत. ७ जानेवारीला मराठ्यांनी मोगलांवर हल्ला केला. मोंगलांची परिस्थिती कठीण झाली. बादशाही छावणीतून सैन्य पाठवून त्यांची सुटका करावी लागली. १० जानेवारी १७०० रोजी रहमतपुरापलीकडे मराठे सरदार धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर आणि राणोजी घोरपडे हे एकीकडे आणि मोगल सरदार झुल्फिकार खान, बहरामंदखान, हमीदुद्दीन खान हे दुसरीकडे असे प्रखर युद्ध झाले. मराठ्यांची फौज १५ हजार होती. निकराच्या युद्धानंतर मराठे १ मैल मागे हटले. या लढाईत पाचशे मराठे मारले गेले. २२ जानेवारी रोजी धनाजींनी हल्ला करून खानापूरचा मोगल सरदार धरला. मराठ्यांचे मुख्य ठाणे चंदनवंदन किल्ल्यात होते तेथून ते मोगलांची उत्तरेकडील वाट अडवीत. आपले सरदार कामात कुचराई करतात अशी औरंगजेबाची तक्रार होती. औरंगजेबाने लष्करातील मुख्य काजी महंमद इकराम यास बोलावून त्याजकडे आपल्या मनातले वरील विचार बोलून दाखविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ १० जानेवारी इ.स.१७२४
बाजीराव-पोर्तुगिज यांच्यात तह झाला
.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ १० जानेवारी इ.स.१७३०
शनिवारवाड्याचे बांधकाम १७३०ला सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत करण्यात आली.
शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत, पेशव्यांचा दरबारच येथे होता. पेशव्यांच्या घरातील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ १० जानेवारी इ.स.१७३४
या दिवशी मराठ्यांनी रायगडवाडी व पाचाड ही ठिकाणे जंजिऱ्याच्या शिद्दीपासून कायमची हिसकावून घेतली व शिद्दीस पुन्हा एकदा धास्ती उत्पन्न केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ १० जानेवारी इ.स.१७३९
इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.
केळवे पाणकोटा प्रमाणे हा किल्ला सुध्दा इतिहासकालात समुद्रात होता. पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भूईकोटाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. काही वर्षापूर्वी हा किल्ला पूर्ण वाळूखाली गाढला गेला होता. ‘किल्ले वसई मोहिमे’ अंतर्गत २००८-०९ साली या किल्ल्याभोवतीची वाळू उपसून किल्ल्याचा पहिला मजला मोकळा करण्यात आला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ १० जानेवारी इ.स. १७६०
कुंजपुऱ्यानजीक यमुना ओलांडून दत्ताजी शिंदे यमुनेच्या पश्चिमेस आले. इकडे अब्दालीने कुरुक्षेत्राच्या पूर्वेकडे यमुना ओलांडली आणि तो अंतर्वेदीत उतरला. दत्ताजी आता पुन्हा यमुनेला उतार पाहत दिल्लीच्या रोखाने जात असता इकडे अब्दाली थेट दक्षिणेकडे येऊन बुराडीजवळ यमुना ओलांडून
बेसावध असलेल्या दत्ताजींवर चालून आला. दि. १० जानेवारी १७६० रोजी दत्ताजी शिंदे मारले गेले. दोन वर्षांपूर्वी मराठी सैन्याने जिंकलेल्या अटक, लाहोर, कुंजपुरा या ठाण्यांवर अहमदशहा अब्दालीच्या फौजांनी हल्ला चढवून तेथील मराठी फौजा पराभूत झाल्याच्या बातम्या आल्या. यावेळेस मराठ्यांचे मोठे सैन्य भाऊसाहेबांजवळ होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ १० जानेवारी इ.स.१७६१
बचेंगे तो और भी लढेंगे - दत्ताजी शिंदेंना वीरमरण
संक्रातीचा सण असून मराठी फौज सकाळी स्नान करून, तिळगुळ खाऊन तयारीने बसली होती. सकाळी नजरेच्या टप्प्यात यायच्या आत गिलचे चारही घाटांवर ८ मैलांवर आले आणि त्यांनी तोफांच्या सहाय्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. पाठोपाठ बंदुकधारी रोहील्यांचे पायदळ नदीपार करण्यास पुढे येऊ लागले. बुराडी घाटावर जानराव वाबळे याची नेमणूक केलेली होती. मराठी सैनाची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी, भाले असून फार कमी शिपाई बंदुका वापरीत. त्याउलट रोहिले - अफगाण बंदुकधारी असून जोडीला त्यांनी तोफखाना देखील आणला होता. मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला त्यांना समर्थपणे तोंड देता आले नाही. अफगाणी सेनेच्या तोफांनी बुराडी घाटावर जानरावचे शंभर - दीडशे शिपाई मारले गेले. दत्ताजी बुराडी घाटावर आला. दत्ताजी आल्याने सैन्याला धीर मिळाला व ते शत्रूचा नेटाने मुकाबला करू लागले.आपली तलवार गाजवू लागला परंतु दुदैवाने रोहील्यांच्या गोळीबारात मराठ्यांचा हा रणशूर सेनानी घोड्यावरून खाली आला.दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"
आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उदगारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगे ऽऽऽऽ!"
कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.
त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.
रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.
त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून
पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ १० जानेवारी इ.स.१७७५
दुसर्या बाजीरावाचा जन्म,
बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला. इतर पेशव्यांना जसे लष्करी पद्धतीचे शिक्षण मिळाले होते व त्यांचे व्यक्तिमत्त्व जसे बहुआयामी घडले होते तसे व्यक्तिमत्त्व दुसरा बाजीराव यांस मिळाले नाही कारण त्याचे शिक्षण मुख्यतः फक्त भिक्षुकी शिक्षण झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments
Post a Comment