ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️ ११ जानेवारी इ.स.१६६६
(पौष वद्य प्रतिपदा शके १५८७ संवत्सर विश्वावसू वार गुरूवार)

मिर्झाराजे जयसिंगांची महाराजांच्या जिवीताची हमी घेतली.
मिझर्झाराजे जयसिंग यांच्या बरोबरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांनी महाराजांच्या जिवीताची हमी जरी दिली असली. तरी दिलेरखानाने मात्र महाराजांच्या हत्येचा कट रचला व अमलात आणण्यासाठी मिर्झाराजे जयसिंगांच्या कडे परवानगी मागितली अर्थात मिर्झाराजे जयसिंगांनी ती धुडकावली व महाराजांच्या सुरक्षेसाठी आपले खास रक्षकदल दिले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

▶️ ११ जानेवारी इ.स.१६८०
(पौष वद्य पंचमी शके १६०१ संवत्सर सिद्दार्थी वार रविवार)

महाराजांनी खांदेरी दुर्ग बांधला!                
         छत्रपती शिवाजी महाराजांना इंग्रज चांगलेच भिऊन होते. महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले ते इंग्रजांना जरब व सिद्दीच्या अन्यायास प्रतिकार करण्यासाठी आणि त्यांच्या लुटमारीस पायबंद घालण्यासाठी प्रसंगी कुठल्याही परिस्थितीत आरमारी हल्ला करणे व मुंबई बेटांत येणाऱ्या शत्रूचे पारिपत्य करणे सोपे जावे याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरीच्या एका ओसाड बेटाचे महत्त्व ओळखून एक दुर्ग उभा केला. त्या बेलाग दुर्गाचे नाव होते दुर्ग खांदेरी! इंग्रज, सिद्धी, पोर्तुगीज यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी महाराजांनी हा कोट उभारला व हा खांदेरीचा कोट बांधून पूर्ण केला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

▶️ ११ जानेवारी इ.स.१६८०
कर्नाटक मोहिमेवरून परत आल्यावर शिवाजी महाराजांनी मुंबई बेटानजीक खांदेरी, उंदेरी ही बेटे ताब्यात घेऊन तेथे किल्ला बांधण्याचे ठरविले (ऑगस्ट १६७९) शिवाजी महाराजांच्या या उपक्रमासमुंबईकर इंग्रजांनी प्रखर विरोध केला.” “ही बेटे इंग्लंडच्या राजाच्या मालकीची आहेत” असे सांगून बघितले. पण शिवाजी महाराजांनी त्यांना दाद दिली नाही. ६ सप्टेंबर १६७९ च्या दरम्यान मराठ्यांचे ४०० बांधकामाचे कामगार खांदेरी बेटावर आले. बेटावर चढण्यासाठी जागा होत्या त्या सर्व बंद करून घेण्यासाठी १ यार्ड उंचीची तटबंदी मराठ्यांनी सुमारे ४७० मजूर लावून व अहोरात्र काम करून बांधून घेतली.  मधल्या काळात इंग्रज-मराठ्यांच्या चकमकी सतत चालूच होत्या. इकडे शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी सामन्याची तयारी ठेवून खांदेरीवरील बांधकाम वेगाने सुरू ठेवले. आखाताच्या बाजूने भिंत बांधण्यासाठी २०० मजूर कामाला लावले होते. १९ डिसेंबर १६७९ पर्यंत या बेटातील तटांच्या भिंतीचे बरेचसे बांधकाम पुरे करीत आले होते. त्यासाठी त्यांचा अहोरात्र परिश्रम चालला होता. ११ जानेवारी १६८० पर्यंत हेन्री-केन्री टेकडीच्या शिखरावर ६ ते ८ फुटाची भिंत चुन्यांत बांधून काढली गेली. खांदेरीस मजबूत किल्ला बांधून तेथे ८०० लोकांची वसाहत शिवाजी महाराजांनी केली. हा किल्ला अशा ठिकाणी बांधण्यात आला की त्याच्या पल्ल्यांतून शत्रूचे कोणतेही जहाज सुटून जाऊ शकणार नव्हते. मधल्या काळात जंजिऱ्याचा सिद्दी मध्ये पडून त्याने उंदेरी ताब्यात घेतली व त्याने तेथे नवा किल्ला बांधला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

▶️ ११ जानेवारी इ.स.१६८१
(माघ शुद्ध द्वितीया शके १६०२  संवत्सर रौद्र वार मंगळवार)

           पोर्टोनोव्हा या पोर्तुगिजांच्या प्रदेशात सुभेदार म्हणून गोपाळ दादाजी यांची नियुक्ती छत्रपती संभाजी महाराजांनी केली. पोर्टोनोव्हाला गोपाळ दादाजी हेच सुभेदार राहीले. पोर्टोनोव्हा या पोर्तुगिजांच्या प्रदेशात सुभेदार म्हणून गोपाळ दादाजी यांची नियुक्ती छत्रपती संभाजी महाराजांनी केल्याने गोपाळ दादाजी हे पोर्टोनोव्हाला रवाना झाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

▶️ ११ जानेवारी इ.स.१७१७
अकबराने गुजरात प्रांत जिंकून तिथे तोडरमल्लाची सुभेदार म्हणून नेमणूक केली. तिथपासून गुजरात सुभा मोगलांच्या ताब्यात होता. १७११ ला गुजरातचा ४४ वा सुभेदार निजामाचा बाप गाजीउद्दीन मरण पावला व त्याचे जागी अमानतखान याची नेमणूक झाली. त्याचे कारकीर्दीत खंडेराव दाभाडे व दमाजी गायकवाड, कदमबांडे या सरदारांनी गुजरातेत अनेक स्वाऱ्या केल्या आणि वसुली पण छत्रपती शाहू महारांजांनी तारीख ११ जानेवारी १७१७ रोजी खंडेराव दाभाडे यांस सेनापतीपद देऊन गुजरातेत मोहिम करून तो प्रांत सर करण्याचा हुकूम दिला. खंडेरावांचे पुत्र त्रिंबकराव आणि त्यांचे हस्तक पिलाजी गायकवाड यांनी गुजरातेत अनेक स्वाऱ्या करून मराठी सत्ता वाढविली. १७२७ मध्ये दाभाडे व गायकवाड यांनी गुजरात प्रांतावर चौथाईची खंडणी लागू केली. तेव्हा मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर बुलंदखान ह्यास गुजरातचा ५३ वा सुभेदार नेमून पाठविले आणि निजामाचा पुतण्या हमीदखान याची नेमणूक रद्द करून त्यास परत बोलाविले. निजामास यामुळे राग आला आणि त्याने हमीदखानास अहमदाबाद न सोडण्याविषयी लिहिले. ही बातमी दिल्लीस कळताच सुरतेचा सुभेदार रुस्तुमअलीखान यास असा संदेश आला की, त्याने तात्काळ अहमदाबादचा सुभा हमीदखान यास हाकून द्यावे. यावरून रुस्तुम अलीने पिलाजी गायकवाडास अनुकूल करून घेऊन अहमदाबादेवर चाल केली. ही वार्ता हमीदखानास कळताच त्याने कंठाजी कदमबांडे या मराठे सरदारास आपल्या पक्षाकडे वळवून घेतले आणि बडोद्याकडे चाल केली. दोन्ही सैन्यांनी आडास गावी तीन कोसाच्या अंतराने तळ दिला. दोन मराठे सरदार विरुद्ध बाजूने मिळून युद्धास सिद्ध झाले असा वरकरणी देखावा दिसला. पण लढाईस तोंड लागताच रुस्तुम अल्ली मारला गेला. त्याजकडील मराठे हमीदखानास मिळाले. हमीदखानाने रुस्तुम अल्लीचा पाडाव केला. हमीदखानाने कंठाजी व पिलाजी यास समजावून महीच्या पूर्वेकडील प्रांताची चौथाई कंठाजीस देण्याचा करार घडवून आणला. १७२६ मध्ये गायकवाड, कदमबांडे हे सरदार गुजरातेत बलिष्ठ झाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

▶️ ११ जानेवारी इ.स. १७२२
(माघ शुद्ध एकादशी शके १६४९, प्लवनाम संवत्सरी)

           श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पत्नी सौभाग्यवती काशिबाईसाहेब पुत्ररत्न प्राप्त जाहले (दि. १६ डिसेंबर १७२१). पुण्याला धडफळ्यांच्या वाड्यावर खबर पोहोचली. आपण पुण्यात आल्यावर हा शुभशकूनच झाला असे राधाबाईंना वाटले. हे त्यांचे पहिलेच नातवंड होते. बाजीरावसाहेबांनी पुण्यात साखरा वाटण्याचा हुकूम सोडला. खासा हत्ती आणून हत्तीवरून साखरा वाटल्या. आपल्याला पुतण्या झाला याचा आप्पांनाही खूप आनंद झाला. सर्वप्रथम साताऱ्याला ही खुशखबरीची थैली व साखरा पाठवण्यात आल्या. बाजीरावसाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांना प्रत्यक्ष येऊन चिरंजीवांस आशीर्वाद देण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन
शाहूमहाराज पुण्याला आले. काशिबाईंनाही लहानग्या बाळासह पुण्याला आणण्यात आले होते. छत्रपतींनी स्वतः बाळाला मांडीवर घेऊन कौतुक केले. बाळ मोठे गोड होते. पुत्रमुख हे अगदी पितृमुखासारखेच होते. शाहूमहाराजांनी पुण्यात फार मोठा दानधर्म केला. माघ शुद्ध एकादशी शके १६४९, प्लवनाम संवत्सरी म्हणजेच दि. ११ जानेवारी सन १७२२ रोजी बाळाचे मोठ्या थाटात बारसे करण्यात आले. पूर्वीच्या काळी आजोबांचेच नाव नातवाला ठेवण्याचा प्रघात होता. म्हणूनच मुलाचे नाव 'बल्लाळ' ठेवण्यात आले. आजोबांच्या नावाचा वारसा घेऊनच पुत्र जन्माला आला होता. समारंभ मोठ्या थाटात पार पडला. याच सुमारास कोकणात कान्होजी आंग्रे आणि पोर्तुगिजांच्यात तंटे उत्पन्न झाले. पोर्तुगिजांच्या प्रभावापुढे आंग्रे तग धरू शकेनात. शेवटी कान्होजी आंग्र्यांनी पुण्याला बाजीराव पेशव्यांकडे मदतीसाठी स्वार पाठवला. कान्होजींनी मदतीसाठी पेशव्यांना पाचारण करण्याची बातमी कळताच पोर्तुगिजांचे धाबे दणाणले. पेशव्यांपर्यंत स्वार पोहोचायच्या आधीच इकडे पोर्तुगिजांचा स्वार आंग्र्यांकडे तहनामा घेऊन आला. केवळ वर्षभरापूर्वीच पेशव्यांनी महाबलाढ्य निजामाचा कसा पराभव केला याचे संपूर्ण चित्रच पोर्तुगिजांसमोर उभे होते. जिथे निजामाचा पाड लागत नाही तिथे आपले काय होणार, या विचाराने पोर्तुगिजांनी आधीच घाबरून तहाची भाषा सुरू केली. शेवटी दि. ९ जानेवारी १७२२ रोजी वरसोली येथे पेशवे (आंग्रे) व पोर्तुगिजांच्यात तह झाला. यावेळेस तह करायला प्रत्यक्ष बाजीराव पेशवे वर्मोली येथे गेले असतील असे वाटत नाही. कदाचित पेशव्यांच्या तर्फेने कान्होजी आंग्र्यांनी अथवा इतर कोणत्या मातब्बर सरदाराने तहनामा स्वीकारला असू शकतो. कारण लगेचच दोन दिवसांनी पुण्यात बाजीरावांच्या पुत्राचे बारसे मोठ्या उत्साहात साजरे झाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

▶️ ११ जानेवारी इ.स.१७३०
श्रीमंत बाजीराव पेशवे बुंदेलखंडात मोहिमेवर असताना इकडे राधाबाई आणि चिमाजीआप्पांनी नानासाहेबांच्या लग्नाची बोलणी सुरू केली होती. वाईचे सावकार भिकाजी गोखले यांची कन्या गोपिका (माहेरचे नाव?) सून म्हणून सर्वांनाच पसंत होती. खरे म्हणजे गोपिकाबाईंचे स्थळ खुद्द सातारकर शाहूमहाराजांनीच सुचविले होते. गोखले व शाहूमहाराजांचे संबंध घरोब्याचे होते. एक दिवस, लक्ष्मीपूजनास (दिवाळी) शाहूमहाराज गोखल्यांकडे फराळाला आले. फराळ वाढताना महाराजांनी गोपिकेला पाहिले. मुलगी मोठी गोड होती. नेमकी याच वेळेस शाहूमहाराजांना नानासाहेबांची आठवण झाली. जोडा फार शोभून दिसेल म्हणून शाहूमहाराजांनी भिकाजी नाईकांना विचारले. अखंड हिंदुस्थानात आपली पराक्रमी तलवार गाजवणाऱ्या बाजीराव पेशव्यांचा मुलगा आपल्याला जावई म्हणून लाभतो आहे, हे पाहून भिकाजी नाईकांना आनंदच झाला. महाराजांनी ताबडतोब चिमाजीआप्पांना बोलावून घेतले. आप्पांनाही मुलगी पसंत पडली. बाजीरावांना खलिता धाडून कळविण्यात आले. बाजीरावांनी होकार कळवला. अखेर लग्न ठरले आणि दि. ११ जानेवारी १७३०, पुण्याच्या वाड्याच्या भूमिपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी श्री क्षेत्र वाई येथे बाजीरावांचे चिरंजीव नानासाहेब व भिकाजी नाईकांची कन्या गोपिका यांचा विवाह झाला. लग्नात अक्षता टाकायला सातारहून खुद्द छत्रपती महाराज आले होते. शाहूमहाराजांचे म्हणणे ऐकून गोखल्यांनी 'रास्त काम केले' म्हणून महाराजांनी त्यांना 'रास्ते' नाव दिले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments