ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️ १३ जानेवारी इ.स.१६८०
संभाजीराजे व शिवाजी महाराज यांची पन्हाळा या गडावर ऐतिहासिक भेट. युवराज संभाजीराजांनी मोगल छावणीतून पळ काढला व ते पन्हाळगडावर वडिलांस भेटावयास डिसेंबर १६७९ त परत आले. तेथे पितापुत्रांची भेट दिनांक १३ जानेवारी १६८० रोजी झाली. महाराजांची एक मोठी काळजी दूर झाली. भेट झाल्यावर संभाजीराजांनी महाराजांच्या पायावर डोके ठेविले. महाराजांनी संभाजी राजांस जवळ बसण्याचा आग्रह केला. संस्कृतपटू संभाजीराजे विनयाने वडिलांपाशी बसले. महाराज संभाजीराजांस म्हणाले, “लेकरा, मला सोडू नको. औरंगजेबाचा व आपला दावा. तुजला दगा करावयाचा होता. परंतु, श्रींने कृपा करून सोडून आणिला. थोर कार्य जाले. आता तू ज्येष्ठ पुत्र, थोर जालास आणि स्वतंत्र राज्य कर्तव्य हे तुझ्या चित्ती आहे असे आपणांस कळले. तर मजला हे अगत्य आहे. तरी तुजलाही राज्य एक देतो. आपले पुत्र दोघेजण एक तू संभाजी दुसरा राजाराम-ऐसियास- हे सर्व राज्य आहे. यास दोन विभाग करतो. एक चंदीचे राज्य, याची हद्द तुंगभद्रा तहद् कावेरी हे एक राज्य आहे. दुसरे राज्य तुंगभद्रा अलीकडे गोदावरी नदीपर्यंत राज्य आहे. ऐशी दोन राज्ये आहेत. त्यास तू वडील पुत्र. तुजला कर्नाटकचे राज्य दिधले. इकडील राज्य राजारामास देतो. पुत्र दोन राज्ये करणे. आपण श्रींचे स्मरण करून उत्तर सार्थक करीत बसतो." असे बोलिले. तेव्हा संभाजीराजे बोलिले की, "आपणांस साहेबांचे पायाची जोड आहे. आपण दूधभात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहीन.” असे उत्तर दिधले आणि राजे संतुष्ट जाहले. मग पितापुत्र बैसुन कुलराज्य आपले देखिले. [सभासद बखर]

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १३ जानेवारी इ.स.१६८५
मराठ्याचा पुण्यावर मारा व इतर भागात हालचाली, कोथळीगडाजवळ ७०० मराठी स्वार, १००० मराठा सैनिक शिरवळ भागात तर नवलाख उंब्रे येथे मराठी फौजेच्या हालचाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १३ जानेवरी इ.स. १७०९
औरंगजेब बादशहाचा मुलगा शहाजादा मुअज्जम याने जाजावच्या आग्र्याजवळ लढाईत आपला भाऊ आझमशहा याचा १७०७ च्या अखेरीस पराभव करून त्यास ठार मारिले व स्वतः बहादूरशहा हे नाव धारण करून दिल्लीचा बादशहा झाल्याची द्वाही फिरविली. त्यावेळी शाहू महाराजांनी आपला सरदार रायभानजी भोसले आणि कृष्णाजी दादाजी प्रभू या मावळातील प्रभुंना आपले वकील म्हणून वऱ्हाणपुरावर बहादूरशहाचे भेटीस पाठविले. पुढे आपला प्रतिनिधी गदाधरपंत यासही शाहू महाराजांनी बादशहाकडे पाठविले. त्यांनी बादशहाचे दर्शन घेतले. यामुळे शाहू महाराजांची एकनिष्ठता सिद्ध होऊन बादशहा शाहू महाराजांवर खूष झाला. शाहू महाराजांनी मिळविलेला प्रदेश बादशहाने त्यांजकडे कायम केला. महाराजास शिरपाव दिला आणि त्यांची दहा हजाराच्या मनसबीवर नेमणूक केली. तद्नंतर बादशहा राजपुतान्यात स्वारीवर गेला, पण इतक्यात त्यास बातमी कळली की, कामबक्षाने दक्षिणेत बंडावा करून आपणास बादशहा म्हणून जाहीर केले आहे. तेव्हा तो कामबक्षावर चालून आला. ह्या झुंजीत त्याने शाहू महाराजांस व मराठे सरदारांना आपल्या मदतीस बोलाविले. शाहू महाराजांनी नेमाजी शिंदे यांस फौजेनिशी बहादूरशहाच्या मदतीस पाठविले. दोन तीन महिने पावेतो फौजेची व्यवस्था लावून तारीख १३ जानेवरी १७०९ या दिवशी हैद्राबादजवळ बहादूरशहाने कामबक्षाशी लढून त्यास कैद केले, पण तो दुसऱ्या दिवशी निवर्तला.(१४ जानेवारी १७०९). हे प्रकरण संपल्यावर शाहू महाराजांनी पाठविलेला वकील बादशहास भेटला आणि “शाहू राजास चौथाई व सरदेशमुखी देण्याचे जे बादशहाने ठरविले आहे ते कायम करावे” अशी विनंती केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १३ जानेवारी इ.स.१७६१
पानीपत युद्ध भूमीचे आता रंग बदलत चालले होते मराठ्यांच्या छावणीत आता अन्नधान्याची फारच कमतरता भासू लागली. कितीही पैसा द्यायचा ठरवलं तरी धान्य तर हवे ना! शेवटी धान्यसाठा पूर्णतः संपायच्या आत उपासमार होऊन मरण्यापेक्षा लढणे योग्य असा विचार करून मराठ्यांच्या फौजेतले सैन्याचे सुभेदार सदाशिवरावभाऊंकडे लढण्याची मागणी करू लागले. पौष शुद्ध सप्तमी, मंगळवार म्हणजेच दि. १३ जानेवारी १७६१ या दिवशी सदाशिवरावभाऊंनीही आपला लढण्याचा विचार पक्का केला. बाजारात असलेले राखीव धान्य साऱ्या भुकेल्या फौजेत वाटण्यात आले. रात्रीच्या वेळेस जेवणं झाल्यानंतर सदाशिवरावभाऊंनी, समशेरबहाद्दर, रघुनाथराव, विश्वासराव, इब्राहिमखान, नाना फडणवीस, नाना पुरंदरे अशा सर्व प्रमुखांना छावणीत बोलावले. सर्वानुमते 'उद्याच झुंज घ्यावे' असे ठरले. भाऊसाहेबांनी युद्धाचा व त्यानंतर कोणी, कसे काय करायचे याचा आराखडा सर्वांपुढे मांडला. 'युद्ध आपणच जिंकणार! परंतु जर दुर्दैवाने तसे न होता गिलचे आणि अफगाण जोरावर आले तर युद्धभूमी सोडून बाहेर जावे. असं मसलतीत ठरवण्यात आलं

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १३ जानेवारी इ.स.१६७२
इ. स. १६७१ च्या अखेरीस दिलेरखानाने चाकण घेतलें, ही हकीकत शिवाजी महाराजांना रायगडावर कळली. १३ जाने. १६७२ रोजी शिवाजी महाराज महाडास आले व त्यांनी अनेक किल्ल्यावरील सैन्य जमा केले. त्यांनी चाकण पुन्हा काबीज केलें व महत्त्वाचे अनेक कैदी रायगडावर धाडले. त्यांतील आजारी व जखमी कैद्यांची त्यांनी सन्मानपूर्वक शुश्रुषा करविली. ज्यांनी त्यांचेजवळ नौकरी करण्याची इच्छा प्रदर्शित केली, त्यांस त्यांनी आपलेकडे राहवून घेतले व बाकीच्यांस सोडून दिले. दिलेरखानाचा पराभव हा बादशहाचा पराभव होता; कारण दिलेरखान दख्खनचा सुभेदार होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १३ जानेवारी इ.स.१७७९
वडगावचा तह
रघुनाथरावाशी संपूर्णपणे वाकडे धरू नये, असे तुकोजी होळकर, मोरोबादादा फडणीस आणि सखारामबापू यांना वाटत होते. यातूनच बारभाईत मतभेद वाढू लागले. सखारामबापू आणि मोरोबादादा फडणीस यांनी पेशवाईचा मालक सवाई माधवराव पण रघुनाथरावाने वडिलकीच्या नात्याने कारभार करावा, असा बेत करून १७७८ च्या मार्चमध्ये पुणे ताब्यात घेतले; पण महादजी शिंदे फौजेनिशी पुण्यास येऊन दाखल झाले व मोरोबाच्या कटाची इतिश्री झाली; मोरोबास कैद करून पुढे १८०० पर्यंत तुरूंगात ठेवण्यात आले. याच सुमारास मुंबई कौन्सिलने पुरंदर तहाच्या विरूद्ध कंपनीच्या संचालकांकडे तक्रार करून युद्ध चालू ठेवण्याचा हुकूम मिळविला. रघुनाथरावाला घेऊन कंपनीची छोटी फौज पुण्याच्या दिशेने निघाली. तळेगावजवळ तिला वेढण्यास येऊन वडगावचा अपमानकारक करार १३ जानेवारी १७७९ रोजी मान्य करावा लागला. यावेळी सखारामबापूंचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला आणि बापूंना कैद झाली. नाना फडणीसांना सर्वाधिकार प्राप्त झाले. पुढे कलकत्त्याहून सेनापती टॉमस गोडार्डच्या हाताखाली दुसरी फौज सुरतला येऊन दाखल झाली. युद्धास पुन्हा तोंड फुटले आणि १७८२ च्या मे महिन्यात सालबाईच्या तहाने ते थांबले. रघुनाथरावास सालिना तीन लाख रु. देऊन त्याने कोपरगावी रहावे असे ठरले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १३ जानेवारी इ.स.१७९२
इ.स. १७९१ च्या अखेरीस महादजींनी पुन्हा महाराष्ट्रात येण्याचे ठरवले. गेली सात वर्षे त्यांचे वास्तव्य उत्तरेतच, बहुतांशी मथुरा शहरातच असे. अतिशय पवित्र असणारे हे शहर त्यांना अत्यंत प्रिय होते. शिवछत्रपती महाराजांपासून काशी, मथुरा, प्रयाग, वृंदावन ही तीर्थक्षेत्रे स्वराज्यात असावीत, असे प्रत्येकाचेच स्वप्न होते. अन् तीच स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पेशवे अहोरात्र झटत होते. नानांनी महादजींना पत्र लिहून कळवले की, 'मथुरा व वृंदावन ही दोन्ही महास्थळे सरकारचे नावे करून घ्यावीत' यावर महादजींनी उत्तर दिले, 'मथुरा-वृंदावन इ. तीर्थांच्या जागा अविंधांकडे होत्या. त्या घेऊन तीर्थांच्या ब्राह्मणांकडे दिल्या आहेत. ब्राह्मणांस उत्पन्न पोचते पातशाहाजाद्याकडून स्थळांचा करार करून घेतला.' यावर नानांनी आणखी एक पत्र पाठवले, 'श्री काशीत विश्वेश्वराचे मंदिर जुने हजार वर्षांचे मोडून मसिद केली, त्यास विश्वेश्वराचे स्थळ मोकळे होऊन पूर्ववत देवालय व देवस्थापना व्हावी हे हिंदुधर्मास उचित आहे...!' यानंतर पूर्वीच्या वकील-इ-मुतालिकीच्या सनदा आणि आताच्या मथुरा-वृंदावनच्या सनदा घेऊन महादजी पुण्याकडे निघाले. दि. १३ जानेवारी १७९२ रोजी महादजींनी प्रतापगडाहून (उज्जैनजवळील) कूच केले आणि उज्जैन, हुताशनी, बीड, नांदूर, तुळजापूर, जांबगड या मार्गाने दि. ११ जून १७९२ रोजी पुण्याच्या संगमावर पोहोचले. पुरत्या आठ वर्षांनंतर महादजी पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचले!!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments