ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष



⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️ २ जानेवारी इ.स.१६५७

मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत; प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्याइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. ही पत्रंच आज महत्त्वाचा दस्तावेज आहेत. या पत्रसंभारात शिवमाता जिजाबाईंचे एखादेच पत्र मिळते. अर्थात तेही शिवाजी महाराज मोहिमांत गुंतलेले असताना रयतेच्या तक्रारींचा निवारा करण्यासाठी लिहिलेले हुकूमवजा पत्र असून ते दि. २ जानेवारी १६५७ रोजी लिहिले आहे. त्या पत्रात त्या म्हणतात,‘‘आज रख्तरबाने राजेश्री जिजाबाईसाहेब दामदौलहू बजानेवू हुद्देदारांनी व देसमुखांनी व मोकदमानी मौजे पासांबे पेठ जिजापूर सुभासबा खमसैन अलफ वेदमूर्ती राजेश्री विनायकभट जोसी त्यासी साहेबी मेहरबान होऊनु मिरासी अजरा मऱ्हामतेलंकराचे लेकरी दिधला असे पेठमजकुराची बिता सदरहू मिरासीपणे तुम्हास दिधली असे ती तुम्ही सुखी मिरासपणाचा कारभार करीत जाऊन पेठेचे मामुरी करणे म्हणोन वेदमूर्ति जोसी यास दिधली असे.. तेणेप्रमाणे साहेब चालवतील मो।’’

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ २ जानेवारी इ.स.१६६१
मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी मुजुमदारी बहाल केली. मोरोपंत त्रिमल पिंगळे. शिवशाहीतील एक मानाचे पान. स्वकर्तुत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व. हिंदुपतपादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला, ते तीर्थक्षेत्र राजगड. या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारी विभूती म्हणजे मोरोपंत पिंगळे. या मोरोपंत पिंगळ्यांचे कर्तुत्व अफजलस्वारीच्या प्रसंगांवरून ध्यानी घेऊन शिवरायांनी त्यांना मुजुमदारी बहाल केली. तो दिवस म्हणजे इ.स. २ जानेवारी १६६१. मुजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहाणे. केवढी महत्वाची जबाबदारी ही ? अष्टप्रधानमंडळातील एक महत्वाचे पद. पण मोरोपंतांचे क्षात्रतेज लपू शकले नाही. जमा - खर्च प्रामाणिकपणे पाहाण्याच्याइतकीच तरवार चालवण्याची धडाडी आणि उत्तम मुत्सद्देगिरीचा पिंड लाभलेले मोरोपंत, हे पूढील वर्षभरातच 'पेशवे' झाले (दि.०३/०४/१६६२).
मोरोपंत पेशवे पंतप्रधान - ते हेच. स्वराज्यस्थापनेच्या काळापासून सतत शिवकार्याचे पाईक ठरलेले हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
https://youtu.be/6_7QqV18_m0

▶️ २ जानेवारी इ.स.१६७१
१६७१ ते १६७४ युवराजांनी जिजाऊ आउसाहेबांच्या वृद्धापकाळात मुलकी कारभार सांभाळला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१६७१
सरदार सुर्यजी काकडे यांना वीरमरण
साल्हेरच्या युद्धात जय मिळाला, पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दु:ख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता, शूर जिवलग सूर्याजी काकडे हा मारला गेला. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांच्या तोंडूनउद्गार बाहेर पडले, ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा महा भारतातील कर्ण होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१६८२

(माघ शुद्ध चतुर्थी शके १६०३ संवत्सर दुर्मती वार सोमवार)

खेड शिवापुरचा कसबा खान जहाबहादूर याने लुटला.

           खान जहाबहादूरकडून बातमी आली की, त्याने शिवापुरचा कसबा लुटला असून आणखी लूट करण्यासाठी त्याने रहुल्लाखानास मलकापूरला पाठवले. मलकापूर लुटीसाठी सोबत म्हणून शहाबुद्दीनखान, व दिलेरखानाचा मुलगा फत्तेमन्सूर आदींना पाठवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१६८४
किल्ले फोंड्याच्या बचावासाठी सुरवातीला मराठ्यांना आपला फिरंगी दारूगोळ्यापुढे निभाव लागणार नाही असे वाटले होते, फोंडा हा गड मराठ्यांच्या ताब्यात रहावा, तो शत्रूच्या हाती पडू नये, स्वामींची फत्ते व्हावी म्हणून तेथील हवालदार, सरनौबत, सबनीस, नाईकवाडी हे फोंड्याच्या ‘पिराला’ नवस बोलले होते. स्वामींची फत्ते झाल्यावर आजच्या दिवशी कवी कलशाने धर्माजी नागनाथाला लिहून पिरास दरवर्षी ५० होण उदफूल, दिवाबत्ती साठी दिले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१६८८

(पौष शुद्ध दशमी शके १६०९ संवत्सर प्रभव वार सोमवार)

हरजीराजे महाडिक यांचा पराक्रम!

       जिंजी प्रदेशात हरजीराजे महाडीक यांची मोठी साथ छत्रपती संभाजी महाराजांना मिळत होती. हरजीराजे शुर व पराक्रमी! मुळातच तशातच महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचे बळ लाभल्यामुळे त्यांना जास्त बळकटी आली. हरजीराजेाजे महाडिक यांनी कोनीमेरच्या उत्तरेकडील ९, नऊ मैलांवरील मराकण हा प्रदेश लुटला!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१७३५

मराठे व पोर्तुगीज यांच्यात १७३० सालानंतर बरेच आमनेसामने झाले. पोर्तुगीजांस पेशव्यांशी युद्ध नको होते. कारण पोर्तुगीजांना मराठ्यांची दहशत वाटत असल्याचे उल्लेख आहेत. पोर्तुगीज व मराठे यांचे चौलच्या मशिदीजवळ २ जानेवारी १७३५ ला झुंज होण्यापूर्वी काही दिवस, बाजीरावांनी सन १७३२ च्या तहास अनुसरून कल्याण व भिवंडी येथील व्यापाऱ्यांसाठी वसईत एक वखार बांधण्यास वसईच्या 'जराल' कडे जागा मागितली होती. परंतु त्याने ति जागा तर दिली नाहीच, उलट खुद्द बाजीरावांस अनुलक्षून 'निग्रो' (Negro) असा अपमानास्पद शब्द वापरला !

ह्या काळी पोर्तुगीज लोक हिंदूस सामान्यतः 'जेंतीव' (अशिक्षित) किंवा 'नेग्रु' (काळा) अशा शब्दाने संबोधीत. वासुदेव जोशी यांनी बाजीरावांना लिहिलेल्या पत्रात लिहितात, 'फिरगियांनी लबाडी केली. पत्र पाठविले त्याचे उतर मगरूरपणे लिहिले याकरिता त्याला ठेचगा द्यावा म्हणून लिहिले. निदान दोन अडीच हजार माणूस व  दीड हजार व दोन हजार स्वार सिद्ध करावे म्हणजे स्वामींचे प्रतापे कार्य सिद्धीस जाते.' 

पुढे १७३९ सालात मराठ्यांनी वसई प्रांतातला पोर्तुगीज अंमल पूर्णपणे उठवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


▶️ २ जानेवारी इ.स.१७५४
पुण्याच्या विकासाबरोबर नानासाहेबांचे घराकडेही लक्ष होतेच. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी शके १६७५, श्रीमुखनाम संवत्सरी रविवारी म्हणजेच दि. ९ डिसेंबर १७५३ या दिवशी नानासाहेबांचे द्वितीय पुत्र माधवराव यांचा रमाबाई (जोशी) यांच्याशी मोठ्या थाटात विवाह करण्यात आला. माधवरावांच्या विवाहानंतर नानासाहेब पेशवे मोहीमेवर निघाले. दि. २ जानेवारी १७५४ रोजी पुण्यातून प्रस्थान ठेवल्यानंतर थेट बागलकोट हरिहर गाठून तेथून राहिलेल्या खंडण्या वसूल करून नानासाहेब दि. ४ जून १७५४ या दिवशी पुण्यात परत आले. याच महिन्यात, २६ जूनला नानासाहेब पेशव्यांची ओंकारेश्वराजवळ सुवर्णतुला करण्यात आली. यावेळी नानासाहेबांचे वजन १७८ पौंड भरले. ही सारी सुवर्णसंपत्ती रयतेला वाटण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
https://youtu.be/6_7QqV18_m0

▶️ २ जानेवारी इ.स.१७५४
इंग्रज आणि कर्नाटक नबाब यांच्या भांडणात मुरारराव घोरपडेनी मध्यस्थी केली व दोघांकडूनहि पैसे घेतले. तसेच फ्रेंचांबरोबर तह केला  व पुढील भांडणात ते इंग्रजांविरुद्ध लढले. आणि इंग्रज फ्रेंचांच्या कलहात भाग घेऊन त्यांनी आपल्या हातून गेलेली त्रिचनापल्ली पुन्हा मिळविली. या घडामोडी पेशव्यास पेशव्यांचा कर्नाटकातील वकील लिहून कळवित होता. त्यान पेशव्यास कर्नाटकात त्वरीत येण्यासाठी लिहिले. त्याप्रमाणे पेशवे २ जानेवारी १७५४ रोजी पुणे सोडून कर्नाटक स्वारीस निघाले. ही पेशव्यांची कर्नाटकातील दुसरी स्वारी होती हरपनहल्ली, बागलकोट, होटल्ली, कुडादंगी, बिदनूर इत्यादि संस्थानिकांकडून तारीख २३ मार्च १७५४ पर्यंत ३ लक्ष ६ हजार एवढी खंडणी पेशव्यांनी वसूल केली.  अशा रीतीने ज्यांनी खंडणी दिली त्या त्या पाळेगारांना अभय देऊन पेशवे ४ जून १७५४ रोजी पुण्यास परत आले. वरील स्वारीत पेशवे कर्नाटकात असता त्यास निजाम पुण्यावर चाल करून जाणार अशी बातमी समजली. म्हणून पेशवे घाईने पुण्यास परतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१७५७
प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१७५८
मराठी सैन्याने नळदुर्ग किल्ला जिंकला
नळ राजाने हा किल्ला बांधला व त्यावरूनच ह्याला नळदुर्ग नाव प्राप्त झाले असे म्हटले जाते. सहाव्या शतकात हा चालुक्यांकडे होता. त्यानंतर सन १३५१ पासून ते सन १४८० पर्यंत तो बहमनी राजवटीखाली होता. पुढे तो आदिलशाहीकडे गेला. सन १५५८ मध्ये स्वतः आदिलशाहने ह्याला भेट दिली व त्याची पाहाणी केल्याचे म्हटले जाते.
सध्याचे बांधकाम सुलतान अबुल मुझफ्फर अली आदिलशाहने सन १५६० च्या आसपास केल्याचे म्हटले जाते. त्यावेळी ह्याला शाहदुर्ग असे नाव दिले गेले होते. सन १६७७ मध्ये मुघलांनी हा जिंकला व नंतर औरंगजेबने तो हैदराबादच्या निजामाला दिला. २ जानेवारी १७५८ ला नानासाहेब पेशवा, विश्वासराव, सदाशिवराव व दत्ताजी शिंदे च्या मराठी सैन्याने हा किल्ला जिंकला. मराठेशाहीच्या शेवटी निजामने हा परत जिंकून घेतला.
सन १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेलांच्या लढ्यानंतर हा किल्ला भारतात विलीन झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स. १७६१
भाऊसाहेबांच्या तगाद्यावरून गोविंदपंताने मरणापूर्वी ४,२०,००० रुपयाचा ऐवज नारो शंकराकडे दिल्लीस सुरक्षितपणे रवाना केला. त्यापैकी दिनांक २२ डिसेंबर रोजी दिल्लीहून रुपये १ लाख १० हजार
पायगुड्याच्या तुकडीबरोबर पानिपतास पोचविण्यात आले व ते छावणीत पोचले. पुढे दिनांक २ जानेवारी १७६१ मध्ये पराशर दादाजी ह्या सरदार बरोबर प्रत्येक घोडेस्वाराबरोबर ५०० रुपयाची एक थैली, असे थैली नेणारे ३०० घोडेस्वार घेऊन पानिपताकडे रवाना झाला. मराठ्यांच्या हालचालीवर दुराण्याची पूर्ण टेहळणी होती. दिल्लीहून पानिपताकडे जाण्यास निघालेला पराशर दादाजी दिनांक ४ जानेवारीस रात्री अबदालीच्या लष्करापाशी चुकून गेले आणि ही कोणत्या सरदाराची छावणी आहे असे मराठीत चौकशी केली. दुराण्यांनी हे मराठे आहेत असे त्यांच्या बोलण्यावरून ओळखले व त्यांच्यावर हल्ला केला. हल्यात मराठे घोडेस्वार ठार होऊन फक्त १ घोडेस्वार बचावून दिल्लीस ७ जानेवारी रोजी परत आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१७७३
निघालेल्या फर्मानाने फ्रेंच अधिकारी मादेकची फौज, मुघलिया घोडदळ आणि मिर्झा नजफच्या इतर पलटणी बरखास्त करण्यात आल्या. कसलेल्या युरोपीय फौजांना मराठी फौजेने दिल्लीत पाणी पाजले. मराठ्यांचा मोठा विजय झाला. सर्व भारतात मराठी फौजेचा पराक्रम गाजला. मराठी डंके परत एकदा दिल्लीत वाजले.


🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१७६६
राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग  ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले.‘‘फोर्ट ऑगस्टस‘‘ कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१८०३
दुसरे बाजीराव व इंग्रज यात तह (वसईचा तह) घडून आला ही बातमी वसईहून पुण्यास लगेच पोचली. पुण्यास दिनांक २ जानेवारी १८०३ रोजी अमृतराव, होळकर व त्यांचा दिवाण गणपतराव, मीरखान, बाबा
फडके, मोरोबा फडणीस, वगैरे मंडळी एकत्र जमून पुढील विचार करू लागली. बाजीरावांनी राज्य बुडविले व इंग्रज घरात घातला, यास काढून लावावयाचे तर शिंदे, नागपूरकर भोसले या सर्वांनी एकजुटीने वागून इंग्रजांशी मुकाबला करावयास हवा हा विचार सर्वत्रांस पसंत पडला पण हे शिंदे उत्तरेत, होळकर दक्षिणेत, नागपूरकर भोसले नागपुरात, अशी स्थिती असल्यामुळे ते एकत्र येऊन, त्यांची एकजूट होऊन इंग्रजांविरुद्ध आघाडी बनवून ती प्रत्यक्षात घडवून आणणे हा एकच मार्ग सर्व मराठ्यांना सुचत होता. त्याप्रमाणे मराठे सरदारांकडून हालचाली होऊ लागल्या. त्यांची सर्व हकिगत इंग्रजांस कळत होती म्हणून इंग्रज सावध राहून त्याने हा बनाव होऊ न देण्याच्या क्लृप्त्या शोधून काढिल्या व ते त्यांत यशस्वी झाले. जानेवारी १८०३ पासून पुणे दरबारने होळकर व अमृतराव पेशवे यांच्या पुढारीपणाने सर्व मराठा मंडळाची जूट बनवून मराठी राज्य सावरण्याचे ठरविले. यशवंतराव होळकर यांस अमृतरावांनी पुण्यास बोलाविले होते. त्याबद्दल त्यास एक कोट रुपये देऊ केले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
https://youtu.be/6_7QqV18_m0

▶️ २ जानेवारी इ.स.१८८८
तळेगाव ढमढेरे येथे क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळेंचा जन्म झाला. 
अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना झाली आणि गदर पार्टीच्या कामाने आतंरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रतिमा उजळून निघाली. हे म्हणण्याच स्वच्छ कारण की आजही अमेरिकेतल्या अनेक websites वर गदर पार्टीच्या इतिहासाची माहिती उपलब्ध आहे. गदर पार्टीच्या कामामध्ये लाला हरदयाळ, सोहनसिंग भकना, भाई परमानंद, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे अर्ध्वयू होते. पण या सगळ्यांमध्ये खूपदा भूमिगत काम कराव लागत असल्याने महाराष्ट्रात फारसे प्रसिद्ध नसलेले पण महाराष्ट्रातील अगदी पुण्याजवळील तळेगाव ढमढेरे येथे जन्माला आलेले 'क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे' ह्यांच चरित्र अनन्यसाधारण आहे. त्यांच्या गदर पार्टीमधल्या कामाचा खुद्द सर मायकेल ओडवायर प्रशंसक होता. त्यांची दुर्दम्य स्वातंत्र्यलालसा,शस्त्रे नि स्फोटके हाताळण्यातील प्राविण्य, संकटात बेधडक उडी घेण्याची धडाडी, भविष्याविषयी प्रचंड बेफिकीर पणा, मरणाला निर्भिड पणे सामोरे जाण्याची ताकद यांमुळे ते खरोखर एक क्रांतिरत्न होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१८४८
क्रांतिकारक राघोजी भांगरेंना अटक
इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने चंद्रभागेच्या काठी राघोजीला अटक केली. कसलाही विरोध न करता राघोजीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. साखळदंडात करकचून बांधून त्याला ठाण्याला आणले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. विशेष न्यायाधीशांसमोर राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या निधड्या छातीच्या शूर वीराचे वकील पत्र घ्यायला कोणीही पुढे आले नाही. वकील न मिळाल्याने राघोजीची बाजू न मांडली जाताच एकतर्फी सुनावणी झाली! राघोजीला दोषी ठरविले गेले. त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ २ जानेवारी इ.स.१९४३ 
पहाटे मुरबाड जवळील सिध्दगडाच्या पायथ्याशी एका ओढ्याकाठी वीरभाई कोतवाल त्यांचे सहकारी व इंग्रज यांच्यात रणसंग्राम सुरू होता . यामध्ये वीरभाई कोतवाल व त्यांचे सहकारी हिराजी पाटील शहीद झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtu.be/6_7QqV18_m0
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments