ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️ 📜 २२ जानेवारी इ.स.१६६६
शहाजहान बादशहाचे निधन ! शके १५८७ च्या पौष व. १३ रोजी मोगलांचा पांचवा बादशहा शहाजहान याचे निधन झाले.
शहाबुद्दीन मुहमद किरान उर्फ शहाजहान हा जहांगीर ऊर्फ सेलीमचा जोधपूरच्या राजकन्येपासून झालेला पुत्र होय. सन १६२८ मध्ये हा गादीवर आला. सर्व आप्तांचा नायनाट करून याने सन १६३७ मध्ये शहाजीचा पराभव केला व अहमदनगरचा सर्व मुलूख आपल्या ताब्यात आणला. युरोपियन लोकांच्या बाबरतीत हा मोठा धूर्त होता. त्यांनी धर्माच्या बाबतीत हात न घालावा म्हणून हा अत्यंत दक्ष असे. पोर्तुगीझ धार्मिक जुलूम करतात, म्हणून याने हुबळी नदीच्या काठी असलेली त्यांची वखार छुटली. असफखानाची मुलगी मुमताज ही शहाजहानची बायको होती. या मुमताजवर त्याचे फारच प्रेम होते. तिच्याच स्मरणार्थ याने जगप्रसिद्ध अशी ताजमलची इमारत बांधली. असे सांगतात की, या इमारतीच्या बांधकामावर वीस हजार मनुष्ये बारा-तेरा वर्षे खपत होती. एकूण खर्च नऊ कोटी, सतरा लाख रुपये झाला. याची कार कीर्द म्हणजे मोघल अमदानीचे सुवर्णयुग होय. हल्लीचे दिल्ली शहर यमुनेच्या काठावर यानेच बसविले. हा मोठा विलासी व रंगेल असे. जुम्मा मशीद, मोती मशीद, दिवाणी आम, दिवाणी खास, वगैरे प्रेक्षणीय इमारती यानेच बांधिल्या. हा बादशहा वृद्ध झाला तेव्हां वडील मुलगा दारा राज्यकारभार पाहू लागला. पुढे औरंगजेबाने सर्व बंधूंचा नायनाट करून शहाजहानास कैदेत टाकले व राज्य बळकावले. आठ वर्षांची कैद शहाजहानास भोगावी लागली,
आणि त्यांतच त्याचा अंत झाला. शहाजहान इतरांविषयी बेपर्वा, वर्तनांत गर्विष्ठ, स्थिर वृत्तीचा व शांत स्वभावाचा होता. युद्धकलेत त्यांचे प्रावीण्य विशेष होते. राज्यकारभारातत तो बराच कुशल होता. त्याच्या दरबाराचा डौल विशेष थाटाचा असे. कविता श्रवण, संगीत, नृत्य, नाटक इत्यादींची त्याला विशेष आवड होती. सुप्रसिद्ध मयूर सिंहासनाची निर्मिति यार्नेच केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २२ जानेवारी इ.स.१६७७
छत्रपती शिवरायानी हुसेनखानाचा पराभव केला.
हुसेनखान मियाना, पठाण, जणू दुसरा बहलोलखान अशी त्याची ख्याती. वृत्तीने कजाख, मोठा लढवय्या.
जुलमी अधिकारी - मियाना बंधूंच्या अमलाने गांजलेल्या कोप्पळ प्रांतातील रयतेची हाक छत्रपती शिवरायांच्या कानी आली, सरनोबत हंबीरराव मोहित्यांच्या हाताखाली महाराजांनी फौज रवाना केली. येल्बुर्गा जवळ मोठी लढाई झाली, मराठ्यांच्या तुलनेत पठाणीसैन्य संख्येने जास्त असूनही मराठ्यांनी निकराचे युद्ध केले, 'सहा प्रहरात कुल फौज बुडविली' (सभासद बखर), हंबीरराव,धनाजी जाधव,नागोजी जेधे(कान्होजी जेध्यांचे नातू, सर्जेराव जेध्यांचे मुल) आदींनी पराक्रमाची शर्थ केली. लढाईचे पारडे फिरले, हुसेनखान पळून जाऊ लागला, तेव्हा तरण्याबांड नागोजी जेध्यानी आपला घोडा पठाणाच्या हत्तीवर घातला, हत्तीची सोंड कापून, हत्ती जेर केला, घाबरून हुसेन्खानाने सपकन बाण सोडला, बाण नागोजींच्या कपाळातून घुसून हनुवटी फोडून बाहेर आला. बाण काढताच नागोजीनेचे प्राण पंचत्वात विलीन झाले. त्यांची पत्नी गोदुबाई जेध्यांच्या कारी गावी सती गेली. मियाना बंधू कैद झाले. नागोजी जेध्यांच्या हौतात्म्याची बातमी ऐकून महाराज कारी गावी जेध्यांच्या सांत्वनास गेले. प्रतिवर्षी एक शेर सोने देण्याची मोईन केली.(जेधे करीना)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २२ जानेवारी इ.स.१६८२
संत रामदासस्वामी यांची समाधि !
शके १६०३ च्या माघ व. ९ रोजी आपल्या अंगची भगवद्भक्ति व ईश्वरोपासनेचे तेज यांच्या जोरावर महाराष्ट्राला प्रपंचविज्ञान शिकवून चेतना देणारे विख्यात संत श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी समाधि घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधानाचे वर्तमान समजतांच 'श्रीची इच्छा ' म्हणून रामदास आपल्या खोलीत गेले. त्यानी अन्न खाणे सोडून दिले. फक्त दुधावर निर्वाह करून बाहेरचे हिंडणे -फिरणे हि अंद केले. शंभूराजांनी केलेल्या अनन्वित कृत्यांची हकीगत स्वामींच्या कानावर आली. त्यांनी शंभूराजेंना पत्र लिहून शिवरायाचें् आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा प्रताप । शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ॥" असा उपदेश केला. दिवसेदिवस त्यांची प्रकृति खालावत होती. माघ व ९ ला श्रीराममूर्तीस साष्टांग नमस्कार घालून स्वामी मूर्तिसम्मुख भूमीवर बसले. शेवटची वेळ येऊन ठेपली होती. समर्थांनी उपदेश केला
" माझी काया गेली खरे । परि मी आहें जगदाकरें ।
ऐका स्वहित उत्तरे | सांगेन तीं ।
नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट ॥
तेण सायुज्याची वाट । ठार्थी पडे ॥ "
शेवटी स्वामींनी 'हर हर' शब्द एकवीस वेळा उच्चारून 'श्रीराम' या शब्दा- बरोबर अवतार समाप्त केला.
रामदासांचा जन्म शके १५३० मध्ये रामजन्माच्या दिवशी झाला. हे जांब गावचे कुलकर्णी सूर्याजीपंत ठोसर यांचे चिरंजीव. प्रथमपासूनच रामदास विरक्त होते. लग्नाच्या वेळी हे घरातून पळून गेले. नाशिक जवळील टाकळीस बारा वर्षे यांनी, खडतर, अशी तपश्चर्या केली. आणि पुढील बारा वर्षे सबंध हिंदुस्थानांत भ्रमण करून देशस्थिति स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. आणि दुःखाने विव्हळ होऊन कृष्णातीरी लोकजागृति व धर्मप्रसार करणाऱ्या आपल्या सांप्रदायाची उभारणी केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️२२ जानेवारी इ.स.१७००
३० डिसेंबरला मराठ्यांविरुद्ध मोठ-मोठे सरदार पाठविण्यात आले. पण मराठे हाती लागले नाहीत. ७ जानेवारीला मराठ्यांनी मोगलांवर हल्ला केला. मोंगलांची परिस्थिती कठीण झाली. बादशाही छावणीतून सैन्य पाठवून त्यांची सुटका करावी लागली. १० जानेवारी १७०० रोजी
रहमतपुरापलीकडे मराठे सरदार धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर आणि राणोजी घोरपडे हे एकीकडे आणि मोगल सरदार झुल्फिकार खान, बहरामंदखान, हमीदुद्दीन खान हे दुसरीकडे असे प्रखर युद्ध झाले.
मराठ्यांची फौज १५ हजार होती. निकराच्या युद्धानंतर मराठे १ मैल मागे हटले. या लढाईत पाचशे मराठे मारले गेले. २२ जानेवारी रोजी धनाजींनी हल्ला करून खानापूरचा मोगल सरदार धरला. मराठ्यांचे मुख्य ठाणे चंदनवंदन किल्ल्यात होते तेथून ते मोगलांची उत्तरेकडील वाट अडवीत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️२२ जानेवारी इ.स.१७३२
अखेर वाड्यात राहायला जाण्याचा मुहूर्त ठरला. दि. २२ जानेवारी १७३२,
रथसप्तमीच्या मुहूर्तावर शनिवारवाड्याची वास्तुशांत थाटात करण्यात आली. वास्तुशांतीकरता खुद्द श्रीमंत बाजीराव पेशवे साताऱ्यास छत्रपती शाहूमहाराजांना आमंत्रण द्यायला गेले होते. पण काही कामानिमित्त महाराज येऊ शकले नाहीत. साताऱ्याहून अष्टप्रधानांपैकी काहीजण आले होते. नव्या हवेलीचे नाव काय असावे, याबाबत काही निर्णय होत नव्हता. शेवटी बाजीरावसाहेबांनीच नाव सुचवले. वाड्याची पाहणी करण्यात आली. तो शनिवार होता. वाड्याची पायाभरणी झाली, तोही शनिवार होता. आज (२२ जानेवारी १७३२) वाड्याची वास्तुशांत व गृहप्रवेश होतोय, तोही शनिवारच. म्हणून वाड्याचे नाव ठेवले 'शनिवारवाडा'. वाडा बांधताना ज्या लोकांच्या जमिनी विकत घेतल्या होत्या, त्यांना व इतरांनाही बाजीरावांनी वाड्याच्या आसपास जागा दिल्या व वस्ती करण्यास परवानगी दिली. ही वस्ती म्हणजेच पुणे कसबाच्या शेजारची 'शनिवार पेठ'. वास्तुशांतीनिमित्ते मोठ्याप्रमाणावर अन्नदान करण्यात आले. पेशव्यांनी सोहळा मोठा थाटाचा केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment