ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 २३ मार्च इ.स.१६६०
(चैत्र वद्य सप्तमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, वार शुक्रवार)

संकटाची मालिका!
स्वराज्याचा फास आवळत चालला होता. त्यात भर म्हणून अदिलशहाने मावळच्या सर्व देशमुख, वतनदारांना केदारजी खोपड्याच्या मदतीने कौलनामे पाठवून आदिलशाहीस मदत करण्यासाठी विनंती पत्रे लिहीली. एकीकडून अदिलशाहीने सिद्दी जौहरच्या रुपाने तर दुसरीकडे मोगलांकडून शाहिस्तेखानाच्या रुपाने फास आवळत चालला होता. त्यातच वतनाच्या लोभाने आपलेच लोक फुटून संकटात महाराजांना साथ देण्याऐवजी यवनांना जाऊन मिळत होते, त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २३ मार्च इ.स.१६७४
नेसरी येथे झालेल्या बहलोलखान आणि प्रतापराव गुजर यांच्यात झालेल्या लढाईत ( २४ फेब्रुवारी १६७४ ) प्रतापराव गुजर मृत्यूमुखी पडल्यानंतर मराठा सैन्यानी आनंदराव मकाजी यांच्या नेतृत्वाखाली कानडी मुलुख झोडपायला सुरुवात केली. तेंव्हा बहलोलखान आंनदराव मकाजी यांच्यावर चालून आला पण त्यांनी खानाचा पराभव केला. त्यांनतर दिलेरखान व बहलोलखान आनंदराव मकाजी यांच्यावरती संयुक्तपणे चालून गेले. पण मराठ्यांनी ४५ कोसांची दौड करुन यांच्या संयुक्त फौजांना फार मागे टाकले. ते बहलोल खानाच्या जहागिरीत शिरले. बंकापूर, संपगाव वगैरे लूटून ३००० बैलांवरती ही लुट लादून आनंदराव मकाजी मागे फिरले...

मराठ्यांनी बंकापूर आणि संपगाव या आदिलशाही सरदार बहलोलखानाच्या मुलखात धुमाकूळ घातल्याची इतिहासात नोंद असलेली तारीख आहे २२ किंवा २३ मार्च १६७४ ...

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २३ मार्च इ.स.१६७८
(चैत्र शुद्ध महाराजांनी एकादशी, शके १६००, संवत्सर कालयुक्त, वार शनिवार)

छत्रपती संभाजी महाराजांचा कलशाभिषेक!
       कवी कलश यांच्या सारखे मित्रही युवराज शंभुराजे यांना मिळाला होता. आणि शांक्तपंथीय तंत्रसाधनेचा मार्ग त्यांनी अनुसरला होता. राज्यप्राप्तीसाठी "कलशाभिषेक" करण्याचा विचार झाला गणेशभट, केशवपंडीत, शिवयोगी आणि कवी कलश यांनी युवराज संभाजीराजेचा कलशाभिषेक केला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २३ मार्च इ.स.१६८२
औरंगजेबासोबत त्याचे ३ पुत्र, नातू व सर्व मोठे सेनाध्यक्ष दक्षिणेत गोळा झाले होते, बुर्हाणपुरास त्यांची पुढची व्यवस्था करून २३ मार्च रोजी बादशाहा औरंगाबादेस पोहोचला. 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २३ मार्च इ.स.१७३२
शाहू महाराजांचे अभयपत्र अभयसिंगाने मिळविल्यावर त्याने पिलाजींस तहाच्या वाटाघाटीस बोलाविले. वरकरणी सख्य दाखविले. एकमेकांचे वकील एकमेकांकडे जाऊ येऊ लागले. पिलाजीसुद्धा भेटीस निघाले असता डाकोरजवळ मारेकरी घालून पिलाजींचा खून करण्याचा प्रयत्न केला. मारेकरी तात्काळ पळून गेले. पिलाजींना उपचारासाठी बडोद्यास आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु रस्त्यातच सावळी येथे त्यांचे देहावसान झाले (२३ मार्च १७३२). यामुळे पिलाजींचे पुत्रास चेव चढला. त्यांनी व दाभाड्यांनी मातोश्री उमाबाईसह अहमदाबादेवर चाल केली. अहमदाबादेस वेढा दिला. तेव्हा अभयसिंगाने दमाजी गायकवाडास गुजरातची चौथाई व सरदेशमुखी
देण्याचा करार लिहून दिला व अहमदाबादच्या खजिन्यातून ८० हजार रोख मराठ्यास देण्याचे ठरविले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २३ मार्च इ.स.१७४०
श्रीमंत बाजीरावांनी दि. २३ मार्च १७४० रोजी खरगोण प्रांतात प्रवेश केला. सुभ्याची व्यवस्था लावत असताना बाजीरावांची तब्येत बिघडली होती. दि. ५ एप्रिल रोजी बाजीराव नर्मदाकाठी रावेरखेडी येथे आपल्या वाड्यात येऊन राहिले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २३ मार्च इ.स.१७५४
 पेशवे २ जानेवारी १७५४ रोजी पुणे सोडून कर्नाटक स्वारीस निघाले. हरपनहल्ली, बागलकोट, होटल्ली, कुडादंगी, बिदनूर इत्यादि संस्थानिकांकडून तारीख २३ मार्च १७५४ पर्यंत ३ लक्ष ६ हजार एवढी खंडणी पेशव्यांनी वसूल केली. ज्यांनी खंडणी दिली त्या त्या पाळेगारांना अभय देऊन पेशवे ४ जून १७५४ रोजी पुण्यास परत आले.।वरील स्वारीत पेशवे कर्नाटकात असता त्यास निजाम पुण्यावर चाल करून जाणार अशी बातमी समजली. म्हणून पेशवे घाईने पुण्यास परतले. फेब्रुवारी १७५४ मध्ये मराठे-निजाम संबंध जास्तच बिघडले. पेशव्यांच्या कर्नाटकातील स्वाऱ्या निजामास बिलकूल आवडल्या नाहीत.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २३ मार्च इ.स.१७५७
अब्दाली गोकुळेच्या दिशेने निघाला होता तो माघार फिरून बल्लमगडावर सूरजमलावर चालून गेला. सूरजमल पुन्हा मागे फिरला व अब्दालीने बल्लमगड घेतला. तिथे शिबंदी घेऊन तो पुन्हा मथुरेहून गोकुळास निघाला. एव्हाना मथुरेची राखरांगोळी झाली होती. गोकुळात पोचताच मथुरेच्या बातमीने सावध झालेले आखाड्यातील नंगे गोसावी तयार होते. ४००० नंगे गोसावी तेग धरून अब्दालीचे पारीपत्यार्थ उतरले. ही तारीख होती २३ मार्च १७५७. एव्हाना अब्दालीस आणखी एक बातमी समजली. मराठे दख्खनेतून निघून जयनगरपावेतो पोहोचले होते. दिल्लीच्या खबरा वरचेवर दख्खनेत पोचत होत्याच. परंतु दस्तुरखुद्द पेशवे हे यावेळी श्रीरंगपट्टणच्या स्वारीवर होते. त्यामुळे बहुतांश सैन्य त्यांच्यासोबत होते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २३ मार्च इ.स.१७६९
रघुनाथरावांना नजरकैदेत ठेवल्यानंतर माधवराव नागपूरकर भोसल्यांच्या स्वारीवर निघाले. वास्तविक पाहता १७६६ सालीच जानोजी भोसल्यांची कानउघडणी करून त्यांना वठणीवर आणले होते. त्यांची जप्त केलेली जहागिरही परत केली होती. परंतु जानोजींनी मात्र पुन्हा बंडाची निशाणे दाखवायला सुरुवात केली होती आणि आता माधवरावांना पेशवेपदावरून हटवण्याकरता त्यांनी थेट रघुनाथरावांना साथ दिली, याचा भयंकर संताप
होऊन माधवराव भोसल्यांवर चालून गेले. भोसल्यांचे बळ तुलनेने कमी होते. माधवरावांच्या झंझावाती हल्ल्यांपुढे जानोजी भोसले शरण आले. दि. ३० जानेवारी १७६९ आणि २३ मार्च १७६९ रोजी अनुक्रमे खोलेश्वर आणि कनकेश्वरचा तह करून माधवरावांनी भोसल्यांना अभय दिले. वस्तुतः दमाजी गायकबाड आणि इंग्रजांनाही समज देणे आवश्यक होते, परंतु थोडी प्रकृती नादुरुस्त वाटल्याने माधवराव माघारी पुण्यात आले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २३ मार्च इ.स.१९३१
शहिद स्मृतीदिन
२३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग , राजगुरु , सुखदेव लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. तरुण वयात  देशाकारिता  फांसावर  लटकुन  या  वीरांनी  देशातील  तरुणांच्या हृदयात  क्रांती  ज्योती  पेटविली . भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून  हौतात्म्य पत्करले

 भगतसिंग_राजगुरु_सुखदेव या  विरांना  विनम्र  अभिवादन..!!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments