ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 २९ मार्च इ.स.१६५७
(चैत्र वद्य दशमी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार रविवार) औरंगजेब अडकला!
विजापुर काबीज करून दिल्लीचे तख्त मिळवायचे व नंतर सम्राट म्हणून मिरवायचे असे मनी धरून, औरंगजेबाने बिदर कल्याणी हा भाग जिंकला. पण याच अतिउत्साहात औरंगजेब एका मोक्याच्या क्षणी अफजलखानाच्या हातात सापडला. अफजलखान विजापुरच्या बादशहाशी एकनिष्ठ होता. त्यामुळे त्याने औरंगजेबास ठार मारायचे ठरविले व विजापुरवरील संकट कायमचे दूर करावयाचे असे मनोमन ठरविले. बिदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात आला. मात्र याच प्रयत्नात औरंगजेब अफजलखानाच्या तावडीत सापडून जिवावरच्या संकटावर सापडला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ मार्च इ.स.१६६७
सिंधुदुर्ग आज रोजी बांधून पूर्णत्वास आला, म्हणून महाराजांनी गडावर मोठी पूजा घातली.
मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा केली;" या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौर्‍यांशी बंदरी ऐशी जागा नाही"! आणि ‘‘सिंधुदुर्ग‘‘ नावाची शिवलंका साकार झाली. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला. ‘‘चौर्‍याऎंशी बंदरात हा जंजिरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले‘‘ हा चित्रगुप्ताच्या बखरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व सांगून जातो.

मालवण किनार्‍यावरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज स्वत: हजर होते. किल्ले बांधणीच्या ३ वर्षाच्या काळात महाराजांनी लिहीलेली किल्ले बांधणी संबंधी मार्गदर्शन करणारी पत्र उपलब्ध आहेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜२९ मार्च इ.स.१६९४
नजीकच्या काळातच मोगलांनी कोकणात ठिकठिकाणी आपली लष्करी ठाणी स्थापन केली होती. आंजी अधलराव हा मोगलांच्या पेण येथील ठाण्याचा मुख्य अधिकारी होता. त्याची बदली करण्यात आली होती. मातबरखानाने तेव्हा तेलंगरावचा मुलगा मोगल अधिकारी शिवाजी याला पनवेल, उरण आणि पेणच्या लष्करी तळाचा अधिकार सांभाळण्यास सांगितले. शिवाजी तेलंगरावाने चारशे स्वारींची शिबंदी पेण येथे सज्ज ठेवली होती. आणि ठाणे अधिक मजबूत बनवले. त्या प्रदेशातील मराठ्यांचे कारभारी शंकराजी पंडित यांना ही खबर कळताच त्यांनी मराठी सैन्याला पेणचे मोगलांचे ठाणे जिंकून घेण्याचा हुकूम दिला. त्यानुसार राजमाची गडावर मराठ्यांचे सैन्य एकत्र जमले त्यांनी २९ मार्च १६९४ रोजी पेण जिंकून घेतले. उत्तर कोकणातील मुलुख इ. स. १६९३ मध्ये मोगलांनी जिंकून मोगल साम्राज्यात समाविष्ट केला होता. तरीदेखील कल्याणचा मोगल सर्वाधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीदरम्यान मातबरखानाला कोकण प्रदेशात मराठे सैन्याशी सतत लढत राहावे लागले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ मार्च इ.स.१७३७
मराठ्यांचा जरीपटका साष्टीवर डौलाने फडकला
मराठे पोर्तुगीजांना साष्टीतून हद्दपार करण्यासाठी वसई मोहिमेवर निघाले. मराठ्यांची फौज साष्टी किल्ल्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम गंगाजी बंधू बुबाजी नाईक यांनी पार पाडले. चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्य राजमाची, प्रबळगड, खिडकाळी, शिळ मार्गे कळव्यात आले. लढणारी तुकडी साष्टीकडे (ठाण्याकडे) रवाना झाली.
२६ मार्च १७३७ ला कळव्याकडून आलेल्या या तुकडीने जेरोनिमो हा पाणबुरूज काबीज केला. इशारतीच्या तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी आप्पा सैन्यासह कळव्यात आले. आप्पासाहेबांनी स्वतःच्या हातांनी चिखलावर पेंढा पसरवून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले. २७ व २८ मार्च रोजी चिमाजी आप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला. जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण ‘फत्तेबुरुज’ करण्यात आले. अपुरा दारुगोळा आणि शिबंदी यामुळे पोर्तुगीज आपल्या कुटुंबकबिल्यासह गलबतातून वसई आणि उरणकडे पळून गेले. २९ मार्च १७३७ ला ठाण्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकला. पोर्तुगीज साष्टीतून कायमचे हद्दपार झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ मार्च इ.स.१७५५
इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी आंग्रेंचा सुवर्णदुर्ग घेतला
तुळाजी आणि पेशव्यांचे आधीच वैर असल्याने तुळाजी पेशव्यांचे आदेश मानेनासा झाला,सरकारात ऐवज भरण्यास मनाई करू लागला आणि स्वतंत्र कारभार करू लागला.सुवर्णदुर्ग ते दक्षिण कोकण वर वर्चस्व,प्रबळ आरमार आणि पराक्रमी असल्याने पेशव्यांना नुसत्या फौजेनिशी त्याचा पराभव करणे शक्य नव्हते. त्यामुळे पेशव्यांनी तुळाजी विरुध्द युद्धासाठी इंग्रजांची मदत मागितली,इस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांकडून वारंवार खंडणी घेतल्याने इंग्रज तुळाजीचा काटा काढण्याची संधीच शोधत होते.इंग्रज आणि पेशवे यांच्यादरम्यान १९ मार्च १७५५ रोजी हा दुर्दैवी करार झाला.
इंग्रजांनी या मोहिमेची कामगिरी कप्तान विलियम जेम्स यांच्याकडे सोपवली.इस्ट इंडिया कंपनीची ४१ लढाऊ गलबते मुंबईहून सुवर्णदुर्गकडे निघाली त्यांना पुढे पेशव्यांची ६० गलबते,७ तारवे आणि १ बातेला येऊन मिळाले.अश्या प्रकारे हे संयुक्त आरमार २९ मार्च १७५५ ला सुवर्णदुर्ग ला येऊन थडकले.२ एप्रिल १७५५ रोजी इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ मार्च इ.स.१८४९
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने पंजाब खालसा केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ मार्च इ.स.१८५७
क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments