ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️📜 ८ मार्च इ.स.१५४६
पोर्तुगीज राजाकडून गोव्याच्या गव्हर्नरला एक फर्मान आले. ते फर्मान असे. 'गोव्यातील हिंदूंच्या मूर्तींचा नाश करा. त्यांची देवळे पाडा. हिंदूंना धार्मिक उत्सव करण्यास बंदी घाला. ब्राम्हणांना गोवे प्रांताबाहेर हाकलून द्या. सरकारी अधिकाराच्या जागा फक्त जे ख्रिस्ती धर्म स्वीकारतील त्यांनाच द्या.'
ह्या फर्मानाची ताबडतोब अंमलबजावणी झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ८ मार्च इ.स.१६७०
(फाल्गुन वद्य द्वादशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, वार मंगळवार)
पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला. किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला. गड फत्ते झाला. ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले, आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही, तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ८ मार्च इ.स.१६८९
मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांना कैद केले व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी छत्रपती राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार दि २५ मार्चला त्याने रायगडाला वेढा दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ८ मार्च इ.स.१६९४
औरंगजेबने शहाजादा मुअज्जमचा मुलगा शहाजादा मुइजुद्दीन याला नोव्हेंबर, १६९२ त पन्हाळगडाविरुद्ध रवाना केले. शहाजादा मुइजुद्दीन याने पन्हाळ्याला वेढा घातला. पण किल्ला जिंकून घेण्याचे त्याला जमेना. ऑक्टोबर १६९३ मध्ये रामचंद्रपंत, शंकराजी आणि धनाजी जाधव हे पन्हाळगडाला मदत करण्यासाठी चालून आले. २० ऑक्टोबरपासून चकमकी सुरू होऊन त्या काही दिवस चालू राहिल्या. मराठ्यांनी किल्ल्यात रसद आणि कुमक पोहचविली. याच वर्षी बारामतीचा, मोगलांतर्फे
असलेला ठाणेदार हणमंतराव निंबाळकर हे मराठ्यांना येऊन मिळाले. इ. स. १७०४ मध्ये याचा मृत्यू होईपर्यंत याने मोगलांस सळो की पळो करून सोडले. इ. स. १६९४ त पन्हाळगडचा वेढा मोगलांकडून चालूच होता. औरंगजेबाने ७ मार्च १६९४ रोजी पन्हाळ्याकरिता मोगलांना आणखी ६ हजार सैन्याची कुमक पाठविली. पण ती पोचण्यापूर्वीच शहाजादा मुइजुद्दीन हा पन्हाळा सोडून ८ मार्च १६९४ रोजी निघाला होता. हे समजल्याबरोबर औरंगजेबाने शहाजादा अज्जमचा मुलगा बेदारबख्त, यास पन्हाळ्याच्या वेढ्यासाठी पाठविले. तरीही मोगलांस पन्हाळा किल्ला काबीज करणे जमले नाही. म्हणून औरंगजेबने पन्हाळ्याचा मराठा किल्लेदार परशुराम त्रिंबक यास ३१ ऑक्टोबर १६९९त ताकीदवरपत्र लिहिले, ह्या पत्रास किल्लेदार त्रिंबक याने भीक घातली नाही. पन्हाळ्याला घातलेला मोगल वेढा चालूच राहिला. तो चालू असता धनाजी जाधवांनी बाहेरून मोगलांचा अतिशय उच्छेद केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ८ मार्च इ.स.१७३१
मराठ्यांनी बाजीरावच्या नेतृत्वाखाली निजामाचा सुरतेजवळ पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ८ मार्च इ.स.१७३५
राधाबाईंनी १४ फेब्रुवारी १७३५ ला काशीविशेश्वराच्या यात्रेकरिता पुणे सोडले आणि त्या ८ मार्चला बु-हाणपूरला आल्या. त्यांच्याजवळ काही खास फौज वगैरे नव्हती. शे-पन्नास लोक असतील त्याहून जास्त नाही. बुन्हाणपूर सोडताना येथील मुघल सुभेदाराने प्रवासखर्चासाठी काही रक्कम, तसेच वाटेत रक्षणाकरिता २०० स्वार दिले, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हिंदुस्थानात आपल्या पराक्रमाच्या तेजाने तळपणाऱ्या प्रतापसूर्य श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आईसाहेबांचा पाहुणचार करण्याची आलेली संधी उदेपूरच्या महाराणा प्रतापच्या गादीवरील त्याचा वंशज जगतसिंग याने वाया जाऊ दिली नाही, बाईंचा खूप आदरसत्कार केला. त्यांचे आशीर्वाद मिळवले. प्रवासासाठी रोख रक्कम, तसेच हत्ती, घोडे, सोने-नाणे देऊ केले. उदेपूरचा दिवाण बहिरदास यानेदेखील राधाबाईंना प्रवासासाठी काही रोख रक्कम नजर केली. शाही उमरावांनीदेखील वाटेत जागोजागी राधाबाई यांना नजराणे, आहेर दिले, मेजवान्या दिल्या आणि आपल्या हद्दीतून त्यांना सुखरूप जाऊ दिले. या सर्व यात्रेत बादशाहकडून किंवा कोणत्याही शाही अंमलदारांकडून, सरदारांकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा झाला नाही. किंबहुना त्यांच्याकडून राधाबाईंची चांगली बडदास्त ठेवण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ८ मार्च इ.स.१७५८
मल्हारराव कुंजपुऱ्यावर चालून गेले. तेव्हा बरोबर कुरुक्षेत्र यात्रेसाठी जनानखाना व परिवार होता पलिकडे सरहिंद येथें अबदालीच्या तर्फेने अदुसमदखान बंदोबस्तास होता, त्याने होळकराच्या मंडळीवर चाल करून अटकावून ठेविले पण होळकराच्या संरक्षकांनी अफगाण पहारेकऱ्यास कापून बायकास सोडवून परत नेले. नंतर एक दिड महिना आपले बेत ठरविण्यास घेऊन रघुनाथराव, मल्हारराव वगैरे पुढे चाल करून गेले. ते तारीख ८ मार्च स. १७५८ ला सरहिंद येथे पोचले. तेथे त्यांना अलाजाठची शीख फौज सामील झाली. त्यांनी सरहिंदला वेढा घातला. लढाई चालू झाली. अब्दालीचे सरदार अब्दुस्समदखान व जंगबाजखान यास जखमा लागल्या धरून आणून वस्र भूषणे देऊन आपल्यापाशी ठेविले. शहर लुटून घेतलें. श्रीमंतांनी अबदालीची दहा हजार फौज बुडविली. त्याचा सूड घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ८ मार्च इ.स.१७७१
हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment