ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶📜 ९ मार्च इ.स.१६५०
संत तुकाराम महाराज स्वर्गवासी
संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू (पुणे जिल्हा) येथे झाला, भगवद्‍गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथाचे, रामायण इत्यादिंचा त्यांचा व्यासंग होता.

आपल्या जीवनातून व अभंगातून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य त्यांनी केले.

तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मध्ये त्यांना स्वर्गवास झाला.

तुकाराम म्हणजे दिवाळे निघाल्यामुळे असहाय होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळलेला, नीटपणे संसार करू न शकलेला, सदैव टाळ कुटत बसलेला, व्यवहारशून्य, भोळाभाबडा किंबहुना भोळसट संत, असे काहीसे त्यांचे चित्र अनेकदा आपल्यासमोर उभे करण्यात आले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, येथील समाजमनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्दाम, अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनीतीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडे आव्हान देणारा हा संत म्हणजे एक महान लढवय्या होता.'

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶📜 ९ मार्च इ.स.१६७३
छत्रपती शिवाजी महाराज ९ मार्च रोजी रायगडाहून निघाले ते पाचाडास आऊसाहेबांचे दर्शन, पोलादपूरास कविंद्र परमानंद यांचे दर्शन घेऊन प्रतापगडमार्गे पन्हाळगड बघण्यासाठी निघाले. कोंडाजी फर्जंदाने नुकताच काबीच केलेला पन्हाळगड ! गडावरील मंडळिंनी त्यांना येताना लांबूनच पाहिले व त्यांच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी गडावर गडबड उडाली. गडावर दत्ताजी पंत वाकनीस होते. इतर सर्व मंडळी होती. त्यांची धांदल उडून गेली. महाराज गडावर पोचले. आनंदाचे उधाण आले. दत्ताजी पंतांनी अक्षरशः सोन्याची फुले महाराजांवर उधळून त्यांचे स्वागत केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶📜 ९ मार्च इ.स.१७४७
नानासाहेब पेशवे इकडे मोहिमांमध्ये गुंतले असताना सातारा दरबारातील पेशव्यांचे प्रतिनिधी बाबूजी नाईक बारामतीकर, नागपूरचे रघूजी भोसले, श्रीपतराव प्रतिनिधी, आनंदराव सुमंत, नारोराम मंत्री, यमाजी शिवदेव दाभाडे, गायकवाड इ. मंडळींनी शाहूमहाराजांच्या कानाशी एकच कुजबूज सुरू केली आणि शाहूराजांचे नानासाहेबांविरोधात कान फुकले. म्हणून या कटकटीला वैतागून दि. ९ मार्च १७४७ रोजी 'शिक्के कट्यार व जरी पटका हुजुरे पाठवून जामदारखान्यात दाखल करविले' आणि नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर केले. बाजीरावांच्या काळात दौलतीला झालेले प्रचंड कर्ज नानासाहेब फेडू शकणार नाहीत ही शंका आसपासच्या मंडळींनी शाहूमहाराजांच्या मनात निर्माण केल्याने त्यांना ते खरे वाटून नानासाहेबांना पदच्युत केले. आता नानासाहेब एकतर पुन्हा पेशवेपद मिळवण्यासाठी झोळी पसरतील अथवा शाहूमहाराजांविरुद्ध बंड करतील असे दरबारातील
प्रतिस्पर्धांचे डावपेच होते. परंतु, नानासाहेबही राजकारणात मुरलेले होते. त्यांना विनातक्रार पेशवेपद सोडून उलट, "सर्वस्वी अपराधी अपत्य आहे. पायाशी कोणती सेवा (घडावी ते) सांगणे, (परंतु) आज्ञा होऊन (या) पायांचा वियोग न व्हावा..." अशी अर्जदास्त नानासाहेबांनी शाहूमहाराजांकडे केली. शिवाय पेशवेपदाच्या (नानासाहेबांच्या!) तोलामोलाचा एकही मनुष्य न दिसल्याने दि. १३ एप्रिल रोजी शाहूमहाराजांनी नानासाहेबांनाच पुन्हा पेशवेपदाची वस्त्रे दिली. यानंतर नानासाहेब लगेच कोकणात पुन्हा जम बसवू पाहणाऱ्या पोर्तुगीजांवर चालून गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶📜 ९ मार्च इ.स.१७४९
( चैत्र शुद्ध द्वितीया शके १६७१, शुक्लनाम संवत्सरात गुरुवार)

दि. ९ मार्च १७४९ या दिवशी नानासाहेबांचे पुत्र विश्वासराव यांची मुंज करण्यात आली. विश्वासरावांच्या मुंजीनंतर लगेचच नानासाहेबांचे सावत्र बंधू, मस्तानी आणि श्रीमंत बाजीरावपुत्र समशेरबहाद्दर यांचे लग्न पेठ संस्थानचे संस्थानिक लक्षधीर दलपतराय पवार यांची मुलगी लालकुंवर हिच्याशी करण्यात आले. (एप्रिल १७४९).

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments