ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜१७ एप्रिल इ.स.१६७५
फोंड्याच्या सुभेदाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील एका व्यापाऱ्याला पकडले आणि विनाकारण मराठ्यांना डिवचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला विश्वासू सरदार दत्ताजी पंडित यांना दोन हजार अश्वदळ देऊन फोंड्याकडे पाठविले. दत्ताजी पंडित फोंड्यापर्यंत जाऊन पोहोचता न पोहोचता तेच स्वतः छत्रपती शिवाजी महाराज वायुगतीने निवडक सैन्यदल घेऊन फोंड्यापर्यंत आले आणि त्यांनी फोंड्याला वेढा घातला. हा वेढा चालू असताना छत्रपती बशिवाजी महाराजांनी एक पथक कर्नाटक प्रदेशात आक्रमण करण्यासाठी पाठविले. त्यामुळे दोन आघाड्यांवर तोंड देण्याची पाळी आदिलशहावर आली. १७ एप्रिल १६७५ रोजी किल्ल्याच्या तटबंदीला सुरुंग लावून तसेच शिड्या लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडा जिकला. हा महत्त्वाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर कुठलीही विश्रांती न घेता छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकात घोडदौड सुरू केली व केवळ १५ दिवसात अंकोला, शिवेश्वर इत्यादी किल्ले जिकून घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜१७ एप्रिल इ.स.१६८२
कारवारचे बंदर छत्रपती शिवरायांनी हस्तगत केले होते व त्याशेजारी ‘अंजदीव’ नावाचे एक लहानसे बेट भर समुद्रात नाक्यावरच होते. सिंधुदुर्गाप्रमाणेच तेथेही आपला जलदुर्ग बांधून किनार्याचा बंदोबस्त ठेवावा अशी महाराजांची इच्छा होती. पोर्तुगीझांना शह देण्यास हे ठिकाण सोयीचे आहे हे जाणून छत्रपती संभाजीराजांनी तेथे आपला सुभेदार पाठवून तटबंदी सुरु केली. त्याचबरोबर गोव्याहून पोर्तुगीज गव्हर्नरने लढाऊ जहाजे पाठवून अंजदीव हस्तगत केले ती तारीख १७ एप्रिल होय.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜१७ एप्रिल इ.स.१६८४
म्हैसूरकरांस मराठ्यांनी सतत हल्ले करून जेरीस आणिले तेव्हा म्हैसूरच्या चिकदेवरायाने छत्रपती संभाजी महाराजांशी तहाची बोलणी सुरू करून छत्रपती संभाजीराजांना खंडणी देण्याचे कबूल केले. इ. स. १६८३ च्या सुरुवातीस संभाजी महाराज महाराष्ट्रात परत गेले.राजे परत फिरल्यामुळे चिक्कदेवरायास थोडी शांतता मिळाली. दरम्यान त्याने आपला वकील मुघल दरबारी मदत मागण्यास पाठविला. दिनांक १७ एप्रिल १६८४ रोजी औरंगजेबाने सुजायतखानाला म्हैसूर येथे पाठवून म्हैसूरच्या नायकास साहाय्य दिले. म्हैसूरच्या नायकांनी मागितलेली मोगलांची मदत ऑगस्ट १६८४ मध्ये म्हैसूरमध्ये पोहोचली. म्हैसूर व मुघल यांच्या जोडसैन्याला मराठे हिरिरीने तोंड देत होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜१७ एप्रिल इ.स.१६८४
छत्रपती संभाजी महाराजां चे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेविले. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाआलम यांनी शिकंदर पातशहाकडे १७ एप्रिल १६८४ व ३० एप्रिल १६८४ रोजी फर्माने पाठविली. त्यांत खालील मुख्य कलमे विजापूरकरांसाठी होती :-
(१) स्वारीचा खर्च व रूखद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचविणे.
(२) आपले मुलूखातून फौजेचा व रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
(३) संभाजीची मैत्री व सख्य बाह्यात्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजीचा समूळ फडशा करण्याकरिता विचार करणे. फर्मानांतील बहुतेक कलमे शिकंदर शहाने मान्य केली पण औरंगजेबाने पाठविलेल्या एकही फर्मानाची शिकंदरकडून अंमलबजावणी होऊ शकली नाही. तेव्हा औरंगजेबास आदिलशहा संभाजी महाराजांशी मैत्री व सख्यत्व करतो असा संशय आला. मराठ्यांविरुद्ध मोहिमेत १६८४ मध्यापर्यंत सर्व आघाड्यांवर अपयशच आले होते. संभाजी राजें च्या विरुद्धच्या युद्धात टिकाव लागेना म्हणून औरंगजेबाने दिनांक ३० ऑक्टोबर १६८४ रोजी आदिलशहीविरुद्ध युद्ध पुकारले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜१७ एप्रिल इ.स.१६८७
कर्नाटकांत १६८६ नंतर हरजी महाडिकला मुघलांविरुद्ध लढा द्यावा लागला कारण मोगलांच्या तुकड्या त्या प्रदेशात उतरू लागल्या तेव्हा मराठ्यांनीही त्या प्रदेशांत बराच मुलूख काबीज केला. सरदार गोपाळ दादाजी व विठ्ठल पल्लवी यास हरजीराजे यांनी मुघलांचा पाठलाग करण्याची आज्ञा दिली. पण त्यांची शक्ती अपुरी पडू नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८६ मध्ये केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांना तिकडे जाण्याची आज्ञा केली. या आज्ञेनुसार ते दोघे फेब्रुवारी
१६८७ मध्ये १२००० सैन्यासह कर्नाटकांत पोहोचले. इ. स. १६८७ च्या सुरुवातीस औरंगजेबाने कुतुबशाही जिंकल्यानंतर कुत्बशाहीचे कर्नाटकांतील मुलूख व किल्ले घेण्यासाठी सरदार रवाना केले होते. १७ एप्रिल १६८७ पर्यंत मुघली सैन्याने बाळापुरमपर्यंत कूच केले. त्यास छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठे सैनिकांकडून प्रतिकार झाला नसावा. कुत्बशाहीतील महत्त्वाचा किल्ला कोंडापिली हा मुघलांनी फितुरीने काबीज केल्याची बातमी २९ जुलैला मद्रासला पोचली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜१७ एप्रिल इ.स.१७२०
पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर जो तो पेशवा पद मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता पण छत्रपती थोरले शाहू महाराजांनी वारसा हक्कानुसार व हुशार, कसलेला योद्धा म्हणून बाजीराव बल्लाळ यांनाच पेशवे पद दिले. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी म्हणजेच १७ एप्रिल १७२० रोजी "सातारा जिल्ह्यातील मसुर" या गावात छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पेशवाईचे वस्त्रे दिली. वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकलेले होते. शिपाई गडी करण्याची खुमखुमी त्याच्यात लहानपणापासूनच होती. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜१७ एप्रिल ग.स.१७३९
छत्रपती शाहू महाराज आणि नानासाहेब यांची म्हैसळ गावी भेट.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments