ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 १८ एप्रिल इ.स.१३३६
दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स.१६६०
"अमिर-उल-उमराव नवाबबहादूर मिर्झा अबू तालिब" उर्फ शायिस्ताखान, नात्याने औरंगजेबाचा मामा २८ जानेवारी १६६० या दिवशी खान औरंगाबादहून आपल्या सैन्या निशी दख्खनेत निघाला. मजल दरमजल करीत खान नगरला ११ फेब्रुवारी १६६० या दिवशी आला. २५
फेब्रुवारीला त्याने नगर सोडले. त्यानंतर खान दौंडनजीक सोनवडीस ३ मार्च १६६० पोहोचला. तिथून खान बारामतीस निघाला, खानची पुण्याच्या दिशेने मजल दरमजल पोहोचत होती. १८ एप्रिल १६६० रोजी खान शिरवळास आला. खान आता राजगड, पुरंदर, सिंहगड यापासून थोड्या अंतरावर होता. मराठे अधूनमधून खानावर छापा घालतच होते. महाराज या वेळी पन्हाळ्यावर अडकले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स.१६७७
त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन.
आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार, सोमवार २० ऑगस्ट १६६६ रोजी फुलौतखान कोतवालाने केलेल्या झाडाझडतीत सापडले सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी त्यांचे जे हाल झाले ते पाहून प्रत्यक्ष यमराजही कळवळले असतील. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. जर बोलले असते तर छत्रपती संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.
या दोघांना लाकडी खोड्यात करकचून आवळण्यात आले. हे सर्व हाल छत्रपती शिवाजी महाराज कसे गेले, कुठे गेले, कोणत्या मार्गांनी गेले याचा शोध घेण्यासाठी फुलादखानाने चालवले होते. या दोन्ही वकिलांच्या नाकांच्या पाळ्या चिमट्यात धरून त्यांची डोकी वर करण्यात आली. मीठ कालविलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या नाकपुड्यांत घालण्यात आल्या आणि त्या पिचकाऱ्यांतील पाणी जोराने त्यांच्या नाकात मारण्यात येत होतं आणि इतर प्रकारे तर अनेक हाल, छळवणूक. या दोघांची सुटका कशी करता येईल, याची चिंता महाराज करीत होते.
महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. त्यातील मुख्य विषय असा की, 'मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे.'
औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्याने त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली.
सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. त्यांच्या भेटीने महाराजांना आणि महाराजांच्या भेटीने त्यांना काय वाटले असेल? येथे शब्द थबकतात. प्रेम ना ये बोलता, ना सांगता, ना दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे! १८ एप्रिल १६७७ रोजी त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स.१६९९
१८ एप्रिलला औरंग्यास समजले की मराठ्यांचे सहा हजार स्वार गुलबर्याच्या जवळ येऊन त्यांनी कित्येक खेडी लुटून जाळपोळ केली. हीरापेठ लुटली. बादशहाने त्याचे पारिपत्य करण्यासाठी तरबियतचा भाऊ कामयाब यास रवाना केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स.१७०३
महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिथ बराच काळ राहिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स. १७७४
वैशाख शु. ७ शके १७९६ जयनाम संवत्सरी बुधवारी म्हणजेच दि. १८ एप्रिल सन १७७४ रोजी गंगाबाईच्या पोटी पुरंदरगडावर सवाई माधवरावांचा जन्म झाला आणि अवघ्या चाळीस दिवसांतच त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. इतक्या लहान वयात राज्यकारभाराच्या उच्चस्थानी बसलेली ही जगातील एकमेव व्यक्ती होती. त्यांचे वडील नारायणराव पेशवे यांचा खून होऊन बापाच्या मृत्यूनंतर जन्मलेले हे बाळ. लहान पेशवे हे मराठी राष्ट्राचे आशेचे केन्द्रस्थान होते. त्यांना चुलते माधवराव पेशवे यांचे अवतार असे मानले जाई. बापाच्या पश्चात जन्मलेल्या ह्या बाळाला मातृसुखही फार काळ लाभले नाही. ते तीन वर्षाचे असतानाच आई गेली. त्यामुळे पुढे नानांनी त्यांच्यापुढे सर्व प्रकारची सुखे दत्त म्हणून उभी केली. काही कमतरता भासू दिली नाही. नाना हे त्यांचे पूर्ण आधारस्तंभ बनले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स.१८५९
तात्या टोपे यांना फाशी दिली गेली
इंग्रजांविरुद्ध मुकाबला करणारा १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी. संपूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग भट (येवलेकर). टोपे या त्याच्या उपनावाबद्दल तज्ञांत एकमत नाही. तथापि तत्संबधी दोन भिन्न मते आहेत :
(१) बाजीराव पेशव्याने त्यास मूल्यवान अशी टोपी दिली व ती तो अत्यंत जपत असे.
(२) काही दिवस त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या तोफखान्यावर काम केले.
त्यावेळेपासून हे नाव रूढ झाले असावे. प्रथम तो पेशव्यांकडे तोफखान्यावर नोकरीस होता. सु. ३० वर्षे त्याने मध्य भारतात अनेक संस्थानिकांकडे तोफखान्यावर काम केले. पुढे तो ब्रह्मवर्त येथे नानासाहेब पेशव्यांकडे नोकरीस होता.
त्याने १८५७ मध्ये सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब, लक्ष्मीबाई वगैरेंच्या मदतीने इंग्रजांशी अनेक ठिकाणी मुकाबला केला, काही महत्त्वाची स्थळे जिंकली आणि ग्वाल्हेर येथे नानासाहेबांची पेशवे म्हणून द्वाही फिरवली. १८५७ चा उठाव मीरत, दिल्ली, लाहोर, आग्रा, झांशी, ग्वाल्हेर इ. ठिकाणी पसरला.
उठावात तात्याने नानासाहेब पेशव्यांना संपूर्ण सहकार्य देऊन नानासाहेबांबरोबर वाराणसी, अलाहाबाद इ. ठिकाणी दौरे काढले. जून १८५७ मध्ये जनरल हॅवलॉकने कानपूरला वेढा दिला, त्या वेळी तात्याने महत्त्वाची कामगिरी बजावली; परंतु तात्या, रावसाहेब, ज्वालाप्रसाद यांचा १६ जुलै १८५७ रोजी पराभव होताच, तात्या व इतर मंडळी अयोध्येला गेली. त्यांनी कानपूरवर हल्ला करण्यासाठी विठूरला मुक्काम ठोकला; परंतु तेवढ्यात १६ ऑगस्ट १८५७ रोजी हॅवलॉक विठूरवर चालून गेला. तात्या व त्याचे सहकारी शौर्याने लढूनही इंग्रजांचाच जय झाला.
शिंद्यांचे सैन्य आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी तात्या व रावसाहेब ग्वाल्हेरला गेले. तेथून पुढे जाऊन त्यांनी काल्पी येथे छावणी केली. १८५७ च्या नोव्हेंबरमध्ये तात्याने कानपूरवर चढाई करून जनरल विनडॅमचा पराभव केला आणि कानपूर शहर ताब्यात घेतले; परंतु थोड्याच दिवसांत सर कोलिन कँबेलने अचानकपणे हल्ला करून तात्याचा पराभव केला. कानपूर जिंकण्याचा तात्याचा प्रयत्न फसला, तरी इंग्रजांना हैराण करण्याची त्याची जिद्द कमी झाली नाही.
याच सुमारास सर ह्यू रोझच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी झांशीला २२ मार्च १८५८ रोजी वेढा दिला. तात्या झांशीच्या लक्ष्मीबाईच्या मदतीस धावून गेला; परंतु ह्यू रोझ पुढे त्याचा निभाव लागला नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. पुढे ते सर्व ग्वाल्हेरला गेले. तात्या, लक्ष्मीबाई व रावसाहेब यांनी एकत्र होऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेर काबीज केले; पण सर ह्यू रोझने ते पचू दिले नाही. या युद्धात लक्ष्मीबाई मरण पावली. तात्याने यापुढे गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी इंग्रजांनी त्याचा एक वर्षभर पाठलाग केला. या पळापळीत २१ जून १८५८ ते ९ ऑक्टोबर १८५८ पर्यंत जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी, मंग्रौली इ. ठिकाणी तात्याने लढाया जिंकल्या.
१० ऑक्टोबर १८५८ रोजी मंग्रौली गावी तात्याचा पराभव झाल्यावर ललितपूर येथे त्याची व रावसाहेबाची गाठ पडली. इंग्रज त्याच्या पाठलागावर असताना त्या दोघांनी महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न केला. नागपूर, मंदसोर, झिरापूरवरून ते कोटा संस्थानात नाहरगढला गेले.
इंद्रगढला त्यांनी १३ जानेवारी १८५९ रोजी फिरोजशाहाची भेट घेतली. फिरोजशाह व तात्या देवास येथे थांबले. तेथे इंग्रजांनी छापा घातला. फिरोजशाहाने तात्याला सोडल्यामुळे, तात्या दोन स्वयंपाकी ब्राम्हण व एक मोतदार यांच्यासह शिंद्यांचा सरदार मानसिंग याच्या आश्रयास गेला; परंतु मानसिंगाच्या विश्वासघातामुळे जनरल मीडने तात्याला कैद केले. त्याला प्रथम सीप्री येथे नेण्यात आले. त्याची धैर्य व गंभीर वृत्ती शेवटपर्यंत ढळली नाही. सतत पराभव होऊनही तो शेवटपर्यंत डगमगला नाही. १८ एप्रिल १८५९ रोजी तात्याला फाशी देण्यात आले. तात्याबरोबरच १८५७ चा उठावही समाप्त झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स.१८९८
जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स.१९५१
विनोबांना पहिले ‘भूदान’ मिळाले. पुढे चौदा वर्षे विनोबा भूदान मागत भारतभर पायी फिरले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment