ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 १९ एप्रिल इ.स.१६७३
छत्रपती शिवाजी महाराजांची हुबळीवर स्वारी
अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध प्रतिपदा, शके १६०२, संवत्सर रौद्र, वार सोमवार)

पन्हाळगडावर असंख्य सैन्याची छत्रपती संभाजी महाराजांकडे धाव!
महाराजांच्या निधनाची बातमी गुप्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी इतकी संवेदनशील बातमी गुप्त राहणे शक्यच नव्हते? शंभुराजेंचेही हेर खाते प्रबळच होते. त्यामुळे कर्णोपकर्णी ही बातमी शंभुराजेंना समजली. इतकच नव्हे तर म्रुत्यूसमयी महाराजांच्या जवळ फारशी मातबर असामी नसून महाराजांचे अंतिम संस्कार साबाजी भोसले यांच्याकडून केल्याचेही कळले! महाराजांच्या महानिर्वाणाच्या बातमीनंतर शंभुराजेंना अतीव दुःख झाले याची कल्पना फक्त "तो काळ" करू शकतो! शंभुराजेंनी किल्ले पन्हाळ्यावरच महाराजांचे श्राद्ध आटोपले आणि शंभुराजेंना दुसरी बातमी समजली की, प्रधान मंडळातील काही जणांनी राजारामराजेंना गादीवर बसवून कारभार करण्याचा निर्णय घेतला आहे! मात्र प्रजेमध्ये आणि सैन्यामध्ये शंभुराजे प्रचंड लोकप्रिय असून निसर्ग न्यायानुसार महाराजांच्या नंतर राजगादीवर शंभुराजेंचाच हक्क असल्याने किल्ले पन्हाळ्यावरचे असंख्य सैन्य शंभुराजेंकडे धाव घेत होते. आता शंभुराजेंनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले टाकली!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ एप्रिल इ.स.१७३६
मराठे सरदारांमध्ये एकोपा नसल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीचा पाडाव लांबणीवर पडला. त्यामुळे चिपळूण मधील ब्रह्मेद्रस्वामींचे हबशास जिंकण्याचे टुमणे छत्रपती शाहू महाराजांस सतत जाचू लागले. गोवळकोट आणि अंजनवेल काबीज केल्याशिवाय सिद्दी सात शरण येणार नाही व चिपळूणच्या परशुराम क्षेत्राची झालेली हानी भरून येणार नाही हे शाहू महाराजास ठाऊक होते. पण शाहू छत्रपतींच्या हुकूमाने संभाजी आंग्रे यांनी जंजिऱ्याची मोहिम तशीच चालू ठेविली. दरम्यान सिद्दी सातास
फितविण्याचाही उपक्रम शाहू छत्रपती व स्वामी यांनी आपआपल्यापरी चालविला. पण संभाजी व मानाजी आंग्रे या आंग्रे बंधूंच्या तंट्यामुळे जंजिऱ्यावरील मोहिमेचा परिणाम निष्फल होत होता. शाहू छत्रपतींनी उदाजी पवार व पिलाजी जाधव यांस कोंकणात पाठविले. पिलाजींनी बाणकोट फत्ते करून पुढे गोवळकोट व अंजनवेलवर चाल केली. या आक्रमणास आळा घालण्याचा सिद्दी सातने चंग बांधला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चिमाजी आप्पांस मुद्दाम शाहू छत्रपतींनी कोंकणात पाठविले. मानाजी आंग्र्यांनी चिमाजीस साथ दिली. चिमाजी २० मार्च १७३६ रोजी कोंकणात गेले. रेवास नजीक कामारले तर्फ श्रीगांव येथे सिद्दीची व मराठ्यांची लढाई झाली. तीत सिद्दीचे १,३०० व मराठ्यांकडील ८०० लोक पडले. सिद्दी सात स्वतः कामास आला. “राज्य घेईन, नाहीतर मरून जाईन" अशा निकराने सिद्दीसात लढला. त्यास पळून जाण्याची संधी दिली असता त्याने तसे न करता तो लढला व समरांगणी पडला (१९ एप्रिल १७३६). उंदेरीचा किल्लेदार सिद्दी याकूबही वरील लढाईत मारला गेला. या विजयाने मराठा मंडळास मोठा आनंद झाला. हबशांचे दोन प्रबळ सरदार पडल्यामुळे दुसऱ्या पक्षाचा प्रमुख सीद्दी रहमान याने पेशव्यांशी पूर्वीचा तह कायम करून युद्ध थांबविले. अंजनवेल व गोवलकोट ही स्थळें तूर्त हबशांकडे राहिली. पैकी अंजनवेल तुळाजी आंग्र्यांनी २३ जानेवारी १७४५ रोजी काबीज केली व लगेच गोवळकोटही घेतले. परशुराम क्षेत्राजवळचा हा किल्ला कबजात आलेला पहाण्याचे भाग्य ब्रह्मद्रस्वामीस लाभले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ एप्रिल इ.स.१७५१
मराठी फौजांनी दुआबात चाल केली. मराठयांनी पंधरा हजार पठाण कापून काढले त्यामुळ मराठ्यांविषयी सगळीकड दरारा पसरला. मराठ्यांनी दुआबात आपला अंमल बसवून फत्तेगडास वेढा दिला. तेव्हा अलिमहंमद खानाचा मुलगा सादुल्लाखान १२,००० रोहिले फौज घेऊन अहमदखान बंगशाचे मदतीस आला. त्यांनी मराठ्यावर हल्ला चढविला. परंतु मराठ्यांनी पठाणांचा पराभव केला. सादुल्लाखान जीव घेऊन पळून गेला. हजारो पठाण जखमी व ठार झाले. त्यांची मालमत्ता, हत्ती, घोडे, गालिचे व उंची कपडे मराठ्यांच्या हाती लागले.  मराठ्यांनी दिनांक १९ एप्रिल १७५१ रोजी फत्तेगड काबीज केला. पठाणांचा पूर्ण पराभव झाला. त्यांचा म्होरक्या बहादूरखान दहा हजार पठाण सैनिकासह प्राणास मुकला. अहमदखान बंगश स्वतः रणातून जीव वाचविण्यासाठी पळाला. याच युद्धात दत्ताजी शिंदे चमकला. पठाणांचा पूर्ण मोड झालेला पाहून सफदरजंग खूष झाला. त्याने मराठ्यास त्यांच्या कामगिरीबद्दल तीन कोट द्रव्य व २५ लक्षाचा मुलूख अंतर्वेदीत देऊ केला.  पुढे पावसाळा सुरू होणार होता तेव्हा मराठ्यांनी बंगशाच्या मुलुखात तळ दिला आणि मनसोक्त लूटमिळविली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

📜 १९ एप्रिल इ.स.१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी किल्ले आणि महत्वाची शहरे ताब्यात घेतली. त्यात १९ एप्रिल रोजी नाशिक शहराचा पूर्ण ताबा कॅप्टन ब्रिजने मिळवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ एप्रिल इ.स.१९१०
क्रांतिवीर अनंत कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे यांना नाशिकाचा कलेक्टर जॅक्सन याच्या हत्येसंदर्भात  फाशी दिली गेली.

अनंत कान्हेरे हा गणेश(बाबाराव) दामोदर सावरकर आणि
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या अभिनव भारत ह्या अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकाराक संघटनेचा एक सदस्य होता. कलेक्टर जँक्सन बाबारावांच्या अटकेसाठी
जवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला होता . जँक्सन मराठी नाटकाचा चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळ
झाली असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्न
होत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील
पिस्तुलांपैकी एक होती. अनंताला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयस्कर साथीदारांची जोड मिळाली. जँक्सनचा वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला . त्याला अटक करण्यात आली . कान्हेरे , कर्वे , आणि देशपांडे ह्यांच्यावर खटला भरण्यात आला . २० मार्च १९१० रोजी त्यांना फाशी ठोठावण्यात आली . आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली .

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments