ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष





⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜६ एप्रिल इ.स.१६५६
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜६ एप्रिल इ.स.१६६५
इ.स. १६६५ एप्रिल ६ पोर्तूगीज व्हाईसरायचे पत्र - "शिवाजीराजे कानडा प्रांतांतून गोव्याकडे येणारा तांदूळ ताब्यांत घेण्यासाठीं तुमचीं ९ जहाजे मुरगांव बंदराकडे आली व परत जाऊ लागलीं. त्यामुळे आम्हास कांही लढाऊ जहाजे तेथे पाठविणे भाग पडले. त्यांनी तुमची जहाजें धरुन आणूंन बंदरांत ठेवली. परंतु तुमच्या स्नेहसबंधाकडे लक्ष देऊन मीं तीं जहाजें जाळण्याचा हूकूम न सोडतां परत जाण्यास मोकळीक दिली."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜६ एप्रिल इ.स.१६६६
६ एप्रिल रोजी महाराजांना वाटेतच औरंगजेबाचे पत्र मिळाले. त्यात औरंगजेबाने लिहिले होते- "तुमचे पत्र मिर्झाराजे जयसिंग यांनी ठरविल्या प्रमाणे इकडील प्रांती रवाना झाले. ते पावून बहुत संतोष झाला. इकडील लोभ तुम्हावर पूर्ण आहे, म्हणोन अदकार न करिता खातरजमेने मजल दरमजल निघोन यावे. म्हणजे भेटीअंती बहुत सत्कार पावून माघारे जाण्याविषयीचा निरोप दिला जाईल. पोशाख पाठवला आहे तो घ्यावा." माघारे निघून जाण्याचा निरोप दिला जाईल, हे औरंगजेबाचे वाक्य म्हणजे धूर्तपणाचे द्योतकच आहे. (ज्याने आपल्या भावाला, मुलाला, वडिलांना सोडले नाही तो महाराजांना परत जाण्याविषयी लिहितोय!) असेच प्रवास सुरू असताना महाराजांना मिर्झाराजा जयसिंग यांचा मुलगा रामसिंह याचे पत्र मिळाले. त्यात त्याने महाराजांची आणि औरंगजेबाची भेट ठरली असल्याचे कळवून ११ मे रोजी आग्र्यास पोहोचावे, अशी विनंती केली. महाराज आपल्या सहकाऱ्यासह रामसिंह याच्या सूचनेनुसार ११ मे रोजी आग्र्याच्या अलीकडे येऊन पोहोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜६ एप्रिल इ.स.१७८२
अहमदखानाचे व नजफखानाचे वाकडे होते. त्यामुळे बादशहा शहाअलम हा आपला वजीर नजफखान याच्या वर्चस्वास कंटाळला. शहाअलम बादशहा हा मराठ्यांच्या मर्जीने रहाण्यास उत्सुक होता आणि वारंवार तो बोलून दाखवी की, महादजी शिंदे किंवा हरिपंत फडके यासारखा एक फौजबंद मराठा सरदार सतत दिल्लीस रहावा आणि मराठ्यांनी बादशहास दरमहा २ लक्ष रुपये देऊन करोडीची स्थळे हस्तगत करावी. ही परिस्थिती सन १७८० मध्ये होती. परंतु यावेळी मराठे व इंग्रज यामध्ये नेकीने युद्ध चालू असल्यामुळे मराठ्यास हे कार्य पत्करणे शक्य नव्हते. दिनांक ६ एप्रिल १७८२ रोजी नजफखान मृत्यू पावला. आणि पुढील महिन्यात सालबाईचा तह पुरा होऊन पहिले इंग्रज मराठे युद्ध थांबले. तेव्हा महादजी शिंदे यांना दिल्लीच्या राजकारणाकडे लक्ष पुरवण्यास अवसर मिळाला. बादशहास सन १७७२ त दिल्लीस आणून तख्तनशीन केल्यावेळे पासून महादजी शिंद्यांच्या मनात दिल्लीचा कारभार आपल्या ताब्यात घ्यावा असे होते पण वर सांगितल्याप्रमाणे सालबाई तहापर्यंत महादजींना दिल्लीच्या राजकारणाकड पहाण्यास फुरसत नव्हती. ह्या संधीचा फायदा मिझ नजफखान याने घेतला. पण मिझ नजफ ६ एप्रिल १७८२ मध्ये निर्वतल्यानंतर दिल्लीच्या बादशहाने महादजीस दिल्लीचा कारभार हाती घेण्याची विनंती केली. बादशहा शहाअलम महादजींना दिल्लीस आणण्यास एवढा उतावीळ झाला की, त्याने त्यावेळी दिल्ली दरबारी असलेले मराठ्यांचे वकील हिंगणे यास महादजीस दिल्लीस येण्यास आवर्जून लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे हिंगणे यांनी पाटील बावांस लिहिले, “ही वेळ अशी आहे की, इकडे येण्याने तुम्हाला कीर्तीच नव्हे तर पैसाही मिळेल.”

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜६ एप्रिल इ.स.१८१७
बाजीराव पेशव्याने (दुसरे) इंग्रजांशी लढाई करण्याकरिता गुप्तपणे तयारी चालविली होती. त्याने आपल्याकडील जडजवाहर व खजिना रायगड किल्ल्यात सुरक्षिततेसाठी पाठवून दिला. दिनांक १ एप्रिल १८१७ रोजी एल्फिन्स्टनने बाजीरावास एक कडक पत्र लिहून कळविले की त्रिंबकजीचा पाठलाग जर झाला नाही तर इंग्रज सरकारला आपल्याशी जाहीररीत्या युद्ध पुकारावे लागेल व त्याच्या बऱ्या वाइटाचे धनी तुम्हीच व्हाल. दिनांक ६ एप्रिलला बाजीरावाने एल्फिन्स्टनला भेटीस बोलाविले व नेहमीच्या पद्धतीने याने लाचारी दाखवून लाघवी बोलून डेंगळेच्या बाबतीत आपण निरपराधी आहोत अशी बतावणी केली. एल्फिन्स्टनने त्यावर कठोरपणे सांगितले की एक महिन्याचे आत तुम्ही त्रिंबकजीस पकडून आणून आमचे स्वाधीन करा आणि तोपर्यन्त जामीन म्हणून तुमचे चार किल्ले रायगड, पुरंदर, सिंहगड व त्रिंबक आमचे ताब्यात द्या. या डरावणीने बाजीराव अगदी घाबरून गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments