ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 ३० एप्रिल इ.स.१६५७
(वैशाख वद्य द्वादशी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार)

छत्रपती शिवाजी महाराजांनी जुन्नरवर हल्ला चढविला!
काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला दक्षिणेतील सुभेदार या नात्याने पत्र पाठवले होते. औरंगजेबानेही महाराजांना आपला "प्रेमाचा" खलीता पाठविलेला होता. त्या खलित्यात शिवाजी महाराजांनी "मोगलांचे अधिकारी" या नात्याने विजापूरकरांचा जो प्रदेश जिंकलेला आहे त्याला संमती दिलेली होती. या संमती पत्राची तारीख आहे २३ एप्रिल १६५७. जुन्नर येथील मोगली अंमलदारांना वाटले की ज्या अर्थी शहाजादाचे पत्र मिळाले त्या अर्थी छत्रपती शिवाजी महाराज नक्की दिल्ली दरबाराचा निष्ठावान झाले. पण या गैरसावधपणाचा पुरेपूर फायदा घेऊन महाराजांनी स्वतः जुन्नरला छापा घातला व लक्षावधी रूपयाची खंडणी गोळा केली. दात कोरायला काडीही शिल्लक ठेवली नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३० एप्रिल इ.स.१६६५
(वैशाख वद्य एकादशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार रविवार)

दाऊदखानाचा किल्ले राजगडावर हल्ला!
       दाऊदखानाचे सैन्य किल्ले राजगडाच्या पायथ्याशी पोहोचले. महाराजांचा मुक्काम बहुधा किल्ले राजगडावरच होता. परंतु त्यांचे कुटुंबीय व माँसाहेब जिजाऊसाहेब मात्र यावेळी सिंहगडावर असावेत असे वाटते. (आलमगीरनाम्यानुसार महाराजांचे कुटूंब किल्ले राजगडावरच होते).

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३० एप्रिल इ.स.१६७०
(वैशाख वद्य पंचमी, शके १५९२, साधारण, वार शनिवार)

महाराजांनी पुन्हा हूल उठवली.
               महाराजांनी पुन्हा हूल उठवली की, महाराज सुरतेवर स्वारी करणार आहेत. गुजरातचा बहादुरशहा ५ हजार फौजेसह तळ ठोकून सुमारे ४ महिने बसला व नंतर हात हालवत परत गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३० एप्रिल इ.स.१६७४
एप्रिल १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज कंपनीस खालील खणखणीत निरोप पाठविला की, “सिद्दीला बंदरात जागा दिल्यास मी तुमच्याशी युद्ध करून बादशाही आरमार जाळण्याचा शक्य तितका प्रयत्न करीन आणि मुंबई बेट घेण्याकरिता डचांना १० हजार सैन्याची कुमक करीन” याकरता आपण सिद्दीला प्रवेश मुळीच देता कामा नये.  छत्रपती बशिवाजी महाराजांच्या या धमकीमुळे मुंबईकर इंग्रज भयभीत झाले. त्यांनी ३० एप्रिल १६७४ रोजी सुरतेस पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज कशा रीतीने इंग्रजांस त्रास देणार आहेत याबद्दल कळविले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहीचे करारनामे इंग्रजांस पाठविले. त्याचे भाषांतर केल्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही अटी जाचक आहेत. त्यानंतर हेन्री ऑक्झिंडेनला छत्रपती शिवाजी महाराजांशी तहाचे बाबतीत सूचना देऊन रायगडी राज्याभिषेक समारंभास जाण्यास निरोप दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३० एप्रिल इ.स.१६८५
(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०७, क्रोधेन संवत्सरे, वार गुरुवार)

छत्रपती संभाजी महाराजांचे चुलते अर्जुनजी भोसले मोगली सेवेत!
              औरंगजेबाचे आक्रमण, सत्ताप्रलोभने, वतनाची आमिषे यांचे पेवच फुटले होते. गली ५ वर्षे औरंगजेब बादशहा महाराष्ट्रात मराठीशाही संपविण्यास मराठी साम्राज्य बुडविण्यास आतूर झाला असता, एकट्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याच्या, पराक्रमाच्या जोरावर हा मुघली सेनासागर थोपवून धरला होता. जिवाला जीव देणारे सहकारी सरसेनापती हंबीरराव यासह अनेकांनी पराक्रमाची शर्थ केली होती. औरंगजेब बादशहा खरेच मेटाकुटीला आला होता. मात्र सहजासहजी रणांगणात विजय मिळत नाही. हे पाहून औरंगजेब बादशहाने वतनाच्या तुकड्याचे कागद खिरापती म्हणून वाटण्यास सुरूवात केली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या झंझावाती कारकिर्दीला साथ द्यायची सोडून स्वराज्याशी द्रोह करून काही हरामखोर फितुरांच्या मांदियाळीत सामील झाले. दस्तुरखुद्द छत्रपती संभाजी महाराजांचे चुलते अर्जुनजी भोसले मोगलांच्या सेवेत रुजू झाले. त्यांना २ हजार जात आणि १ हजार स्वारांची मनसब देण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३० एप्रिल इ.स.१७००
सातारा हस्तगत झाला त्याच दिवशी बादशहाने फतुल्लाखानास ‘परळीचा किल्ला’ (सज्जनगड) काबीज करण्यासाठी पाठवले व मागून म्हणजेच आजच्या दिवशी बादशाहा जातीने तिथे पोहचला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments