ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 २५ मे इ.स.१६४२
महाराजांनी रोहिडेश्वराला एक गाव इनाम व जुना पुजारी बदलून सिवा जंगम नावाचा दुसरा पुजारी ठेवला. बंगळूरहून येताच महाराजांच्या नावे पहिली हालचाल किल्ले रोहिड्याच्या भागात झालेली दिसते. एका पत्रानुसार रोहिडेश्वराला एक गाव महाराजांनी इनाम दिल्याचे व जुना पुजारी बदलून सिवा जंगम नावाचा दुसरा पुजारी ठेवल्याचे कळते. याच कारणामुळे रोहीडेखोऱ्याच्या दादाजी नरसप्रभु देशपांडे यांना आदिलशहाने जाब देण्यासाठी त्वरीत बोलाविलेले दिसते. दादाजी यांनी बहुधा जाण्याचे टाळले असावे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ मे इ.स.१६५८
औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शिकोह याचे वारसहक्कासाठी समूगढ येथे लढाई झाला ज्यामध्ये दाराचा पराभव झाला पण दाराने तेथून पळ काढला. आणि पुढे काही दिवसांच्या पाठलागानंतर अखेर दारा औरंगजेबाच्या हाती सापडला. ३० आॅगस्ट १६५९ ला त्याची हत्या करण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ मे इ.स.१६६२
(ज्येष्ठ वद्य द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभकृत, वार रविवार)

पुणे येथे सुप्या जवळ सरनौबत नेतोजी पालकर यांची नामदारखान, सर्फराजखान यांच्याशी चकमक!
सुपे येथे सरनौबत नेतोजी पालकर यांची सर्फराजखान आणि नामदारखान यांच्याशी चकमक उडाली. मराठी फौज काय असते याचा प्रत्यय नामदारखानाला चांगलाच आला. या लढाईत शेवटी सरनौबत नेतोजी पालकर यांना पराभव पत्करावा लागला. मोगलांना थोडी फार लुटही मिळाली. या लुटीची यादी उपलब्ध असून तीत एकूण ६५ वस्तू नोंदविलेल्या आहेत. त्यात १५३ बैल, ८ घोड्या व शिंगरे, ३४ तोळे, ३ मासे रुपे व ७ मासे सोने नमूद केलेले आहे. मोगलांनी आभिमानपुर्वक ही लुट औरंगजेब बादशहाकडे पाठवून दिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ मे इ.स.१६६६
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले असताना एके दिवशी एक भयंकर प्रकार घडला. महाराज आपल्या शामियान्यात आपल्या काही मराठ्यांशी सहज बोलत बसले असता शामियान्याच्या दारावरचे मावळे पहारेकरी एकदम दचकून महाराजांकडे धावले. अन् म्हणाले, ' महाराज , हे पाहा काय! ' महाराज अन् सर्वचजण उठले, दाराकडे धावले. बाहेर पाहतांत तो शेकडो मोगली सैनिक आणि त्यांचा म्होरक्या कोतवाल सिद्दी फौलादखान महाराजांच्या छावणीला सैन्यानिशी गराडा घालीत होता. सुमारे दोन हजार मोगल असावेत. मराठी चिमुकली छावणी गराडली जात होती. कैद! महाराज या गराड्यात कोंडले जात होते. औरंगजेबाने महाराजांना उघडउघड कैद केलं होतं. तुरुंग नव्हता हा. बेड्या नव्हत्या हातात. पण ही कडक कैदच होती. महाराजांना धक्काच बसला. त्यांना भविष्य दिसून आले. पहिला आवेग अनावर झाला. त्यांनी शंभूराजांना पोटाशी कवळीले. एकूणच आपण या आग्रा प्रकरणांत मृत्युच्या जबड्यात अडकलो आहोत याची खात्री झाली. महाराजांची नजर कैद सुरू झाली. तीनशे मावळ्यांच्या मराठी छावणीलाही सैनिकांचा गराडा होता. महाराज, शेजारीच असलेल्या रामसिंगच्या निवासस्थानी या कैदेतुनही जात येत होते. त्यावरही फुलादखानचा पहारा होता. म्हणजेच पळून जाणे संभवतच नव्हते. महाराज चिंतेत पिचून निघत होते. रामसिंग तर दु:खी आणि अगतिक होता. शिवाय त्याच्या डोक्यावर राजपुताचा शब्द म्हणून महाराजांच्या सुरक्षिततेची तुळशीबेलाची पाने हेलावत होती. एकेक क्षण दिवसा दिवसासारखा जड जात होता. महाराजांच्या दोन वकीलांना मात्र छावणीबाहेर कोणाच्या भेटीगाठी किंवा ( गुप्त राजकीय कामेधामे ) यासाठी जाता येत असे. वकील या नात्याने त्यांना मोकळीक होती. रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे ते वकील.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ मे इ.स.१७३३
प्रतिनिधींनी रायगडाला वेढा घातला
सिद्धी रसूल १७३३ फेब्रुवारीत मरण पावला, त्याच्या अब्दुल्ला नामक वडील मुलाचा खून झाला. अब्दुल्लाच मुलगा म्हणजे सिद्धीचा नातू अब्दुर्ररहमान घाबरून मराठ्यांच्या आश्रयास आला. सिद्धीवर हल्ला करण्यास ह्या वेळेसारखी दुसरी वेळ पुन्हा येणार नाही हे चाणाक्ष शाहू महाराजांनी ओळखले. लष्करी मोहिमांचा हंगाम संपला होता तरी पण भर उन्हाळ्यात शाहू महाराजांनी दोनफौजा सिद्धीवर रवाना केल्या-एक बाजीराव पेशव्याच्या हाताखाली जंजीरयावर व दुसरी श्रीपतराव प्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली रायगडावर पाठवली. मध्यंतरीच्या काळात पेशव्याने रायगडच्या किल्लेदाराला लाच देऊन किल्ला हस्तगत करण्याचा प्रयत्न करून पहिला, पण बातमी फुटून पाठवलेला पैसा लुटला गेला. साताऱ्याहून पुन्हा पैसे मागवण्यापुर्वीच २५ मे ला श्रीपतराव प्रतिनिधी आपली फौज घेऊन रायगडी दाखल झाला व ८ जूनला त्याने रायगड पुन्हा स्वराज्यात आणला.
रायगड मोहिमेवरून बाजीराव व श्रीपतराव प्रतिनिधी यांच्यात वादविवाद होऊन काही काळ त्यांचे संबंध बिघडले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ मे इ.स.१७८८
इस्माईल बेगने भरतपुरास वेढा दिला. दिनांक १ मे १७८८ रोजी मराठे व जाट यांची इस्माईल बेगबरोबर भरतपूरच्या ईशान्येस दोन मैलावर लढाई झाली. पण ती अनिर्णीत राहिली. पुढे इस्माईल बेग व गुलाम कादर यांनी भरतपूर सोडून कुंभेरीस वेढा दिला. तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. नंतर ते तिथून डीगला गेले. पण डीगच्या किल्ल्यातून त्याजवर मारा झाल्यामुळे तो १८ मे १७८८ रोजी पळून गेला. मराठे व जाट यांनी या दोघांचा फत्तेपूर शिक्रीपर्यंत पाठलाग केला. पुढे दिनांक २५ मे १७८८ रोजी गुलाम कादर व इस्माईल बेग यांनी आग्र्याबाहेर सैन्याचा तळ दिला. तळावरून आग्र्यास मोर्चे बसविले व तोफांची मारगिरी करु लागले. तेव्हा मराठा फौजेने त्यांची रसद बंद केली.नइस्माईल बेगचे मथुरा-वृंदावनचे ठाणे जिंकले आणि यमुना नदीपार जाऊन गुलाम कादरचे मोटमहाबन येथील ठाणे व तोफा काबीज करून, पलटण मारून काढिले. याच वेळी गुलाम कादरचे मुलुखात शिखांनी दंगा मांडला होता. यामुळे गुलाम कादरला दोन आघाडीवर लढणे प्राप्त झाले. ह्या परिस्थितीस घाबरून गुलाम कादर दिनांक १५ जून १७८८ रोजी इस्माईल बेगला सोडून फौजेसुद्धा स्वतःचे मुलुखाचे बंदोबस्तासाठी यमुनापार गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments