ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 १० मे इ.स.१६२६
सोलापूरचा किल्ला मलिक अंबरने जिंकल्या नंतर खडकीस परत गेला व त्यानंतर एक वर्षाने म्हणजे १० मे इ.स. १६२६ रोजी वृद्धापकाळाने खुल्ताबाद येथे मरण पावला. (इब्राहीमनामा व जेधे शकावली) एक साधारण गुलाम ते सर्वसत्ताधीश असा प्रवास करताना मलिक अंबरने ज्या तडफेने, चातुर्याने व ज्या साहसाने अडचणींना तोंड दिले त्याला तोड नाही. फक्त १५० स्वारांचा नायक असलेल्या मलिक अंबराची तडफ बघून चांदबीबीने त्याला आपल्या पक्षात ओढून त्याच्या गुणांना वाव दिला. पुढे त्याच्या याच गुणांमुळे तो निजामशाहीचा एकमेव आधारस्तंभ
झाला व निजामशाहीचा पडता डोलारा सावरला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १० मे इ.स.१६३४
(वैशाख वद्य अष्टमी, शके १५५६, संवत्सर भाव, वार शुक्रवार)

  थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र. यावरून राजे शहाजीराजे यांच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची ऊंची काय असेल याची कल्पना येते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १० मे इ.स.१६६५
(ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १६८७, संवत्सर विश्वावसू, वार बुधवार)

दाऊदखान किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी!
            दाऊदखान राजा रायसिंगसह पुन्हा किल्ले पुरंदराच्या मुख्य तळावर दाखल झाला. दाऊदखानाचा सहकारी कुतुबूद्दीनखान याने पुण्यातच तळ ठोकला होता. मोगली सरदारांकडून स्वराज्याच्या नासाडीचे सत्र सुरूच होते. मात्र तरीही किल्ले पुरंदरचा वेढाही सुरू होता. किल्ले वज्रगड पडल्यावर पुरंदर लगेचच ताब्यात येईल ही मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखानाची अटकळ होती. मात्र दाऊदखानाचा जागोजागी झालेला पराभव व चिवट मराठी सैनिकांची झुंजार वृत्ती मिर्झाराजे जयसिंग यांची चिंता वाढवत होती.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १० मे इ.स.१६७३
मुंबई बेट इंग्रजांच्या ताब्यात इ. स. १६६४ डिसेंबरमध्ये आले. त्या वेळेपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांशी सख्य राखण्याचा प्रयत्न करीत होते. तदनंतर जानेवारी, १६६४ च्या सुरत येथील लुटीच्या निमित्ताने त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी प्रत्यक्ष संबंध आला. मोगलांकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सर्व गड किल्ले घेतले हे पाहून इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दहशत निर्माण झाली. पण इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू जो सिद्दी यास गुपचूप मदत करण्याचे धोरण ठेविले. शिवाजी महाराजांना हे कळताच त्यांनी इंग्रजांना तंबी दिली. याचा परिणाम असा झाला की सिद्दीचे आरमार पावसाळ्यासाठी १० मे १६७३ रोजी मुंबई बंदरात आश्रयासाठी येऊ लागले तेव्हा त्यास इंग्रजांनी येऊ दिले नाही. इंग्रजांना शिवाजी महाराजांशी चांगले संबंध राखावयाचे होते म्हणून त्यांनी आपला वकील थॉमस निकोलसन यास ११ जून १६७३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीस पाठविले. परंतु त्याचीही काही फलनिष्पती झाली नाही. तेव्हा इंग्रजांतर्फे नारायण शेणवी हा इंग्रजांचा दुसरा वकील बोलणी करण्यास २४ मार्च १६७४ रोजी रायगडावर गेला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १० मे इ.स.१८१८
रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम !
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली. रायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज. पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments