ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜१७ मे इ.स.१६६६
१६ मे या दिवशी बादशाहाने आग्र्याच्या कैदेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी शुजातखानाच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला! त्याचे असे झाले की, औरंगजेबाचे काही महत्त्वाचे सरदार त्याची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले. त्यांचा मुद्दा एकच. या सीवाला ठार मारा. त्याने आपले अनेक अपराध केले आहेत. जहाँआरा बेगम ही बहीण. तिचा मुद्दा आणखीन वेगळा. ती म्हणत होती की, या सीवाने शाहिस्तेखानाची मुलगी पळविली. ती आपली मामेबहीण होती. याच सीवाने सुरत शहराचे मला मिळणारे जकातीचे उत्पन्न खलास करून टाकले. म्हणून याला ठार मारा. आणि खरोखरच औरंगजेबाने तिरीमिरीस यावे तसे येऊन म्हटले की, 'होय. मी सीवाला ठार मारणार आहे!' हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय ऐकताच सर्वजण क्षणभर विस्मितच झाले. बादशाहाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला. हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते. पण आश्चर्य असे की, ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याचे घरी समजली. तो कमालीचा बेचैन झाला. त्याने तातडीने मिर्झा मोहम्मद अमीनखान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगने मीरबक्षीला कळवळून विनंती केली की, माझा अर्ज बादशाहांना आत्ताच्या आत्ता आपण जातीने जाऊन सादर करावा. मीरबक्षीने त्याची विनंती खरोखरच मान्य केली. रामसिंगने बादशाहासाठी अर्ज लगेच तयार केला. तो घेऊन मिर्झा किल्ल्यात गेला मग स्वत:च रामसिंग बादशाहाकडे का गेला नाही! त्याचे कारण बादशाहाची अशी अचानक भेट घेण्याचा अधिकार रामसिंगला नव्हता. तो चौथ्या दर्जाचा सरदार होता.
मीरबक्षीने बादशाहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. त्यात रामसिंगने असे म्हटले होते की,' आपण शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी फर्मान काढीत आहात. आपण सर्वशक्तीमान आहात. आपण राजांना ठार मारू शकता. पण आम्ही शिवाजी राजांना शपथपूर्वक सुरक्षिततेचा शब्द दिला आहे. हा राजपुतांचा शब्द आहे, तरी आपण राजांना ठार मारणार असाल तर प्रथम मला ठार मारा. मग शिवाजीराजांना मारा. हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच. त्यातील पहिली गोष्ट अशी की, सीवाला ठार मारण्यासाठी फर्मान तयार करण्या संबंधीची बातमी येथून बाहेर पडलीच कशी ? रामसिंगला कळलीच कशी ? दुसरी गोष्टी अशी की, रामसिंग म्हणतो की, ' मला प्रथम ठार मारा. मग सीवाला ठार मारा ' याचा अर्थ असाही उघडउघड दिसतोय की, मी जिवंत असेपर्यंत सीवाच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. इथेच बादशाह चपापला. त्याने राजांना ठार मारण्या संबंधीचे फर्मान थांबविले आणि मीरबक्षीला सांगितले की, रामसिंगला उद्या (दि. १७ मे) किल्ल्यात आम्हांस भेटावयास सांगा. छत्रपती शिवाजीराजांचे तातडीने मरण बादशाहाने पुढे ढकलले. दि. १७ मे रोजी रामसिंग किल्ल्यात दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटावयास गेला. बादशाह रामसिंगला म्हणाला, तुझा अर्ज मिळाला, मंजूर आहे. पण सीवा आमच्या परवानगी शिवाय आग्ऱ्यातून निघून जाणार नाही आणि कोणतेही घातपाती कृत्य करणार नाही अशी तू ग्वाही देतोस का ? तू या गोष्टीला जामीन राहतोस का ? प्रश्न भयंकरच अवघड होता. वादळाला जामीन राहण्यासारखेच होते हे. रामसिंगने महाराजांना सर्व हकीकत सांगितली. महाराज ती ऐकून गंभीर झाले. बादशाहाचा आपल्या बाबतीतील डाव अगदी स्पष्ट झाला. महाराज शांतपणे उठले. त्यांनी रामसिंग बरोबर त्याच्या महालातील देवघरात प्रवेश केला. तेथील तुळसीबेल हातात घेतले. अन् देवाला वाहात त्यांनी रामसिंगला म्हटले ' भाईजी, तुम्ही बादशाहांना जमानपत्र लिहून द्या. मी जमानपत्राप्रमाणे वागेन.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇

📜१७ मे इ.स.१७१५
मराठ्यांनी निरनिराळ्या युद्धात वापरलेले घोडदळ
इ.स. १७१५ मध्ये कान्होजी भोसले या मराठा सरदाराने चंद्रपूरच्या युद्धात वापरलेल्या घोडदळाचा उल्लेख मिळतो तो याप्रमाणे, " १७ मे, १७१५ रोजी, जयपूरचा राजा जयसिंगाने पिलसूदच्या लढाईमध्ये कान्होजी भोसल्यांचा पराभव केला. त्यामुळे कान्होजींनी आपला उत्तरेतील मार्ग आडलेला पाहून चंद्रपूर प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून सहा हजार घोडेस्वारांनिशी चंद्रपूरवर आक्रमण केले. चंद्रपूरचा पराभव करून अर्धे राज्य हस्तगत केले. छत्रपती शाहू महाराजांना एक हत्ती नजराणा म्हणून पाठवून कान्होजी उत्तरेकडे वळले."

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇

📜१७ मे इ.स.१७८२
सालबाईचा तह
हा १७ मे, इ.स. १७८२ रोजी मराठे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे याच्या मध्यस्थीने झालेला एक तह होता. या तहामुळे सात वर्षे चाललेल्या पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती झाली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments