ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳

📜 ३ जुन इ.स.१६७३
टॉमस निकल्सची रोजनिशी!
बोलणी करण्यासाठी मी टेकडीवर गेलो. ११ ते मी जाऊन बसलो होतो त्या खोलीत आले. सर्व शिपायांना त्यांनी काढून लावले. (महाराज येऊनही टॉमस निकल्सने त्यांना ओळखले नाही. त्यामुळे महाराजांची मर्जी अप्रसन्न झाली. पण वरकरणी मात्र) चांगली वेळ नसल्यामुळे ते माझ्याशी बोलले नाही.‌ दुपारी ४ वाजता शामजीच्या हाती मी प्रेसिडेंटचे पत्र पाठविले. ५ वाजता बोलावणे आल्यामुळे मी जाऊन बसलो. पण शिवाजी महाराजांना येण्यास थोडा अवकाश होता. ते येताच मी उभा राहून दारापर्यंत गेलो आणि प्रथम आल्यावेळी त्यांना ओळखले नाही म्हणून क्षमा मागितली. त्यांनी माझा हात धरून आपल्या डाव्या अंगाला लोडापासून जवळच बसविले व काय काम आहे असे विचारले. "तहाचे बोलणे चालू असतानाच व ध्यानीमनी नसताना हुबळीची लुट होऊन फार नुकसान झाल्यामुळे तुमच्या मुलुखात वखार घालावी की न घालावी अशी प्रेसिडेंटला शंका उत्पन्न झाली आहे! ही लुट तुमच्या संमतीने झाली काय? असे विचारताच इंग्रजांना त्रास देण्याबद्दल मी कधीच हुकूम दिला नव्हता. त्यांचा आमचा स्नेह आहे. असे ते म्हणाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३ जुन इ.स.१६७४
(ज्येष्ठ शुद्ध दशमी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार बुधवार)

महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली.
     नक्षत्र यज्ञ होऊन उत्तर पुजनानंतर आचार्यांना "प्रतिमादान" केले गेले. महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली होती. किल्ले रायगड हा गड न राहता एक सुंदर नगर म्हणून फुलून गेला होता. गडावर देशोदेशीचे पाहुणे, निमंत्रित, आप्तजन हा सोहळा पाहण्यासाठी किल्ले रायगडी येत होते. किल्ले रायगड साऱ्यांचे स्वागत करीत होता. अभिमानाने म्हणत होता अवघे अवघे या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३ जून इ.स.१६७८
मौनीमहाराज मठासाठी छत्रपति शिवाजी महाराजांची सनद
छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयला निघायच्या अगोदर म्हणजे १६७६ ला पाटगांवला जाऊन श्रीमौनीमहाराज यांचे दर्शन घेतले आणि नंतर लगेच दक्षिण दिग्विजयासाठी दसर्याच्या मुहूर्तावर बाहेर पडले होते.
मौनीमहाराज मठासाठी छत्रपति शिवाजी महाराज आणि पुढचे इतर छत्रपतींनी वेळोवेळी सनदा दिलेल्या आहेत. पहिली सनद सनद शिवरायांनी ३ जून १६७८ रोजी दिली आहे.
मुळ सनदचे भाषांतर :
स्वस्ती राज्याभिषेक शके ४ कालयुक्त संवत्सरे वैशाख बहुल
सप्तमी भूगुवारसे क्षत्रीयकुलावंतस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री गणो राम देशाधिकारी ता. कुडाळ यासी आज्ञा केली यैसी जे मौनीबाबा पाटगावी असतात त्याचे दर्शनास अतीत अभ्यागत आगांतुक बहुत येत असताती त्याला एकदा आन आवावे म्हणजे संतुष्ट होऊन जात जातील म्हणून तुरु(त)गिरी बाबाचा शिष्य याने सांगितले त्यावरून अतीत अभ्यागताबद्दल प्रतिवर्षी एक हजार माणसांची सामग्री ठेवली आहे. दर माणसास तांदुल वजन सडीक कणीक वजन दली वजन तूप वजन मीठ वजन
एकूण पाऊणे च्यारी सर नवटाक रास याप्रमाणे हाजारा माणसांची बेरीज होईल ते आवक साल सन तिसा सबैना पासन देणे खर्च लिहिणे मुजरा होईल.
तुम्ही हे सामग्री त्याचेथे तुरु (त) गीरीपासी वर्षामध्ये एकदा येक देत जाणे तो आल्या गेल्यास  तैसे देत जाईल. तुम्ही काही त्याचे खर्चात मन न घालणे लेखनालंकार (मर्यादेय विराजते)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३ जुन इ.स.१६८०
(ज्येष्ठ वद्य प्रतिपदा, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार गुरुवार)

छत्रपती संभाजी महाराज किल्ले प्रतापगडी!
          शंभुराजे किल्ले प्रतापगडी आले. संभाजी महाराजांनी भवानी देवी आईची षोडशोपचारे पुजा बांधली. स्वराज्यासाठी आशिर्वाद घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३ जून इ.स.१७३३
सरखेल सेखोजी आंग्रेंचं बाजीराव पेशव्यांना पत्रं
दि. ३ जून १७३३ चं सरखेल सेखोजी आंग्रे यांचं बाजीराव पेशव्यांना पत्रं! या पत्रात बाजीरावांची आणि सेखोजींची अनेक राजकारणं आपल्याला दिसून येतात. मुख्य म्हणजे थळच्या किल्ल्याला मोर्चे लावून तो हस्तगत करण्याविषयी बाजीरावांनी आंग्र्यांना सांगितले, पण पावसाने अचानक हजेरी लावल्याने कामात थोडा उशीर होत आहे हे सेखोजी बाजीरावांना सांगत आहेत.

यानंतर सेखोजी आपण तयारी कशी केली आहे ते सगळं सांगतात, उदाहरणार्थ उरणच्या बंदरात गलबते तयार ठेवली आहेत, लहानमोठ्या महागिऱ्या (नौकेचा प्रकार) सुद्धा आहेत. या बळावर उरणाहून उतरून पेण मारावे असा विचार त्यांचा होता. त्यापुढे जाऊन थळहून चौलाही मारायचे होते. याच कारण म्हणजे जंजिरेकर सिद्दी आक्षी-नागाव इथे येऊन तिथल्या ब्राह्मणांना पकडून भ्रष्ट करणार (म्हणजे जबरदस्तीने धर्मांतर) अशी खबर मिळाली होती. आंग्र्यांच्या फौजेचा सिद्दीशी सामना होताच सिद्दी पुन्हा उंदेरीला पळाला. सेखोजी वैतागून म्हणतात, "मोठा हरामजादा हबसी! संपूर्ण प्रांतास दंडास आणिले होते". सिद्दीचा यावेळचा उद्देश काय होता? तर "उंदेरी आणि उरणहून मुलुख मारावा, ब्राम्हण पकडून न्यावे".

पत्राचा स्रोत : पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद, खंड ३३, लेखांक २२

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ३ जून इ.स.१८१८
दि. ३ जून १८१८ या दिवशी सकाळी दहा वाजता खानदेशात अशिरगडाजवळ 'धुळकोट बारी' या
ठिकाणी बाजीराव पेशवे (दुसरे) माल्कमला शरण आले. माल्कमने मोठ्या औदार्याने आणि प्रेमाने त्यांचे स्वागत केले. जनरल माल्कमने गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जची समजूत काढून त्याची संमती मिळवली आणि बाजीरावांना (दुसरे) सालीना आठ लक्ष रु. तनखा देण्याचे मान्य करून कायमचं कानपूरच्या उत्तरेस सुमारे पाच कोसांवर असणाऱ्या बिठूर उर्फ ब्रह्मावर्त या ठिकाणी
राहण्याची व्यवस्था केली. बाजीराव पेशवे  (दुसरे) आपल्या लवाजम्यासह आपले राज्य, सुख, समाधान, रयत, पुण्याचा वाडा अन् आपली जिवाभावाची माणसं अशीच मागे ठेवून कायमचे नर्मदापार निघाले. पुन्हा कधीच न परतण्याच्या मार्गाने. ते आता 'महाराष्ट्राचे पेशवे' राहिले नव्हते... शंभर वर्षांची पेशवाई आता संपली होती... सूर्यास्त झाला होता...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments