▶ लक्ष्मीपुजन आणि नरक चतुर्दशी 

 या दिवाळीत तुमच्या मनातील लक्ष्मीचे पूजन करा...*

लक्ष्मी ही धन- संपत्ती आणि समृद्धीची देवता आहे. 
उपजीविकेसाठी आणि जीवनात प्रगती करण्यासाठी एक अत्यावश्यक घटक म्हणून आपल्याला धन संपत्ती मिळालेली आहे. 
केवळ पैसा असण्यापेक्षाही जास्त ते बरेच काही आहे. मुबलक प्रमाणात ज्ञान,कौशल्ये आणि कला असणे असा त्याचा अर्थ आहे. 
लक्ष्मी ही अशी शक्ती आहे जी आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक अशा सर्व दृष्टीकोनातून संपूर्णपणे अभिव्यक्त होते.

लक्ष्मीचा संबंध लक्ष्याशी म्हणजे ध्येयाशी आहे. 
ती अशी शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या मूळ स्रोताकडे, म्हणजेच तुमच्या लक्ष्याकडे घेऊन जाते. 
ही शक्ती आठ रुपांमधून आपल्यावर कृपेचा वर्षाव करत असते

आदि लक्ष्मी म्हणजे मूळ स्रोताची स्मृती. 
जेव्हा आपण हे विसरून जातो की आपण या संपूर्ण सृष्टीचाच भाग आहोत तेव्हा आपल्याला आपण स्वत: अगदी तुच्छ आणि असुरक्षित आहोत असे वाटू लागते. 
आदि लक्ष्मी हे असे रूप आहे जी आपल्याला आपल्या मूळ स्रोताशी जोडते आणि त्यामुळे सामर्थ्य वाढते आणि मन:शांती मिळते.

धनलक्ष्मी हे भौतिक संपत्तीचे रूप आहे. 
आणि विद्या लक्ष्मी हे ज्ञान, कौशल्य आणि कला यांचे रूप आहे. 
धान्यलक्ष्मी ही अन्नधान्याच्या रूपातील संपत्तीच्या रुपाने आपल्या समोर येते. 
असे म्हणतात की ‘जसे अन्न तसे मन’, म्हणजेच जे अन्न आपण खातो त्याचा आपल्या मनाशी थेट संबंध असतो. 
योग्य त्यां प्रमाणात आणि योग्य ते अन्न योग्य वेळी आणि योग्य त्यां जागी सेवन केले तर तर त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर चांगला परिणाम होतो.

संतत लक्ष्मी संतती आणि सृजनशीलतेच्या रूपात दिसते.
भरपूर सृजनशीलता, काळा आणि कौशल्य असलेल्या लोकांवर ह्या लक्ष्मीचा वरदहस्त असतो. धैर्यलक्ष्मी ही धैर्याच्या रूपातील संपत्ती बनून येते. विजयालक्ष्मी ही जयाच्या रूपात येते. 
भाग्यलक्ष्मी ही सौभाग्याच्या आणि समृद्धीच्या रूपात येते. जीवनातील वेगवेगळ्या पायऱ्यांवर ती वेगवेगळ्या रूपात येते.

पुराणात असे म्हटले आहे की सूर आणि असुर यांच्यात जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा अमृताच्या बरोबर लक्ष्मी वर आली. ( विरोधी मूल्यांमुळे मनातील होणारे द्वंद्व याचेच हे द्योतक आहे.) जेव्हा तुमच्याकडे लक्ष्मी असते, योग्य प्रकारची धन संपत्ती असते तेव्हा तुमचे जीवन अमृतमय होऊन जाते.

पाणी हे प्रेमाचे प्रतिक आहे. लक्ष्मीचे पाण्यातून वर येणे हेच दर्शवते की योग्य प्रकारची संपत्ती ही प्रेमातूनच निर्माण होते. भक्ती ही सर्वात उच्च प्रतीची संपत्ती आहे आणि आणि ते जीवनातील अमृतासमान आहे.

लक्ष्मी ही पाण्यावरच्या कमळात बसलेली दाखवली जाते. 
कमल हे वैराग्याचे प्रतिक आहे. 
कमळाच्या पानावरील पाण्याचा थेंब पानाला अजिबात न चिकटटा पानावर फिरत असतो. त्याचं प्रमाणे आपण संपत्तीत जास्त अडकून न रहाता आणि त्याला धरून न ठेवता राहिलो तर मग त्यातून जे निर्माण होईल ते चीरस्वरूपी आणि फुलासारखे हलके असेल.
अशी संपत्ती जीवनाला आधार देणारी असते आणि त्याने समृद्धी आणि संपन्नता येते. 
संपत्ती पाण्याप्रमाणे प्रवाही असावी. पाणी साठून राहिले तर त्याची शुद्धता कमी होते. 
त्याचप्रमाणे संपत्तीचा उपयोग आणि त्याची किंमत ती प्रवाही ठेवली तरच वाढते.

लक्ष्मी दागिन्यांनी मढलेली असते आणि तिच्या दोन हातात कमळाचे फूल असते. ह्यातून जीवनाच्या उत्सवाचे आणि तेजाचे अंग दिसून येते. समृद्धी असूनही त्या संपत्तीबद्दलची आसक्ती नाही. 
पुढे जाऊन असे म्हणता येईल की जर ही संपत्ती मानवतेच्या कार्यासाठी वापरली तर तुम्ही त्यां दलदलीत अडकून पडणार नाही कारण ती फुलाप्रमाणे हलकी असेल. बिटर दोन हाताच्या मुद्रा आहेत त्या असे दर्शवतात की आशीर्वाद आहे आणि धीर धरा.

दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. 
धन संपत्तीच्या सर्व रुपांचा सन्मान करण्याची आणि आपले जीवन आध्यात्मिक ज्ञानाने आणि महालक्ष्मीच्या शक्तीने उजळून टाकण्याची ही वेळ आहे. 
महा म्हणजे महानता. महालक्ष्मी म्हणजे महान संप्प्त्ती अशी संपत्ती की ज्याची आठ रूपे आहेत. आध्यात्मिक संपत्ती आपल्या सर्व सुखांची काळजी घेते. 
आदि भौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. 

या मंगल प्रसंगी सर्वांना सुआरोग्य, आनंद, आणि समृद्धी लाभो ही शुभेच्छा !

▶ सण साजरा करण्याची पद्धत -

प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा करतात आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.

लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात.
काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात.
लक्ष्मीजवळच लक्ष्मीपूजन कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. 
त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. 
धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासेइत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर तेआप्तेष्टांना वाटतात. 
मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. 
ब्राह्मणांना आणि अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. 

रात्री जागरण करतात. 
जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुषआणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. 

▶लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे महत्त्व -

हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्वकामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य !
श्री लक्ष्मीदेवीला करावयाची प्रार्थना
प्रार्थना करतांना जमा-खर्चाच्या हिशोबाची वही लक्ष्मीसमोर ठेवायची आणि प्रार्थना करायची, ‘हे लक्ष्मी, तुझ्या आशीर्वादाने मिळालेल्या धनाचा उपयोग आम्ही सत्कार्यासाठी म्हणून केला आहे.
त्याचा ताळमेळ करून तुझ्यासमोर ठेवला आहे. त्याला तुझी संमती असू दे. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवू शकत नाही. पुढील वर्षीही आमचे कार्य सुरळीत पार पडू दे. 

’लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढावयाची रांगोळी ११ ठिपके ११ ओळींची रांगोळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केरका काढतात ? 
अलक्ष्मी निःसारण

१. महत्त्वगुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले, तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे; म्हणूनया दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला ‘लक्ष्मी’ म्हणतात.

२. कृतीमध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केरसुपात भरून तो बाहेर टाकावा’, असे सांगितलेआहे. याला ‘अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य)निःसारण’ म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घरझाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्री ते करायचे असते.
कचरा काढतांना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.

नरक चतुर्दशी  ★

हा नरक चतुर्दशीच्या दिवसांतील एक आहे.
दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते. 
आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. 
नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पाप वासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. 
तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते.

आख्यायिका 
नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुर वधाची आख्यायिका प्रचलित आहे. 
या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. नरका सुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. 
त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. 
नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. 
त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. 
त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता.
अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. 
ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. 

या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. 
कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. 
नरकासुर वधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. 
नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. 

कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.

★ संपुर्ण परिपुर्ण माहिती नरकचतुर्थ ★

नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते.या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

नरकासुर वध

१. तिथी

आश्विन वद्य चतुर्दशी

२. इतिहास

‘श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.

३. महत्त्व

आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात. या ध्वनीची निर्मिती लहरींतील रज-तमात्मक कणांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते. या लहरी विस्फुटित लहरींशी संबंधित असतात. या लहरींतील ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते. या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोषांतील रज-तम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षककवच नष्ट होण्यास साहाय्य होते. यालाच ‘आसुरी शक्तींचा वातावरणात दिपाच्या साहाय्याने झालेला संहार’ असे म्हणतात; म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभकार्याला दिपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जिवाने आरंभ करावयाचा असतो. असुरांच्या संहाराचा दिवस, म्हणजेच एकप्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे.

४. सण साजरा करण्याची पद्धत

अ. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करणे

आ. यमतर्पण – अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात.

कारीट ठेचणे
इ. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात.

ई. प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.

५. नरक चतुर्दशीच्या दिवशी करायच्या विविध कृतींमागील शास्त्र

अ. ब्राह्मणभोजन

‘नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे, म्हणजे धर्मस्वरूप अवतरीत होऊन कार्य करण्यासाठी आल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणे. या माध्यमातून ब्रह्मांडात संचारत असलेल्या धर्मलहरींना पुष्टता प्रदान करून अवतारी कार्यासाठी, म्हणजेच पृथ्वीवर येणार्‍या त्रासदायक अधोगामी लहरींना नष्ट करण्यासाठी समष्टीच्या इच्छाशक्तीचा पुरवठा करून प्रत्यक्ष स्वरूपात कार्य करण्यासाठी आवाहन करणे. या माध्यमातून स्वतः धर्मकर्तव्य करून ईश्वराच्या कृपाशीर्वादात्मक लहरींना ग्रहण करता येते.

आ. वस्त्रदान

वस्त्रदान करणे, म्हणजे देवतांच्या लहरींना भूतलावर येण्यासाठी दानाच्या स्वरूपात, म्हणजेच धर्माच्या संवर्धनतेच्या माध्यमातून पोषणता प्रदान करून कार्यस्वरूपाच्या जागृतीचे आवाहन करणे. या माध्यमातून आपल्या धनसंचयाला धर्म स्वरूपाच्या कार्यासाठी अर्पण केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होते.

इ. यमदीपदान

यमदीपदान करणे, म्हणजे लयाच्या ऊर्जात्मक आणि चालनात्मक स्वरूपात होणार्‍या युद्धात स्वतःच्या रक्षणासाठी मृत्यूची देवता यम याला त्याचा भाग देऊन अपमृत्यूपासून स्वतःचे रक्षण करणे. या माध्यमातून धर्माला त्याचा हविर्भाग देऊन तृप्त करून आपले समष्टी कर्तव्य करता येते.

यमदीपदान
याविषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा, ‘यमतर्पण (यमदीपदान) करतांना १३ दिवे अर्पण का करावे ?’

ई. प्रदोषपूजा

‘कालाय तस्मै नमः’ या कालमहात्म्याचे वर्णन करून कालाच्या माध्यमातून कार्यरत होणार्‍या स्थिरात्मक आणि पुरुषदर्शकात्मक क्रियाशक्तीच्या एका भागाची पूजा करून त्याचे संवर्धन करणे, म्हणजेच कार्यदर्शक स्वरूपात्मकता प्रदान करणे. या माध्यमातून कालमहिमा चित्तावर बिंबवून त्याप्रमाणे आचरण करून उच्च स्तराची अवस्था प्राप्त करून धर्म आचरता येतो.

उ. शिवपूजा

समष्टीला त्रास देणार्‍या अधोगामी लहरींच्या निर्दालनासाठी जागृत झालेल्या ईश्वराच्या मारक स्वरूपाच्या सगुणतेला पूजेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणे. या माध्यमातून ईश्वराच्या प्रत्येक कृतीत आपुलकी निर्माण होऊन भाववृद्धी होऊन ईश्वराशी एकरूपता गाठण्याच्या दिशेला वाटचाल होते.

✍ लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Comments