ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २२ मे इ.स.१६३२
मुलुख मैदान तोफ विजापूरला नेहली...
बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर परंडा हा अहमदनगरच्या निजामाकडे आला. तेव्हा इ.स. १६२८ ते १६३० च्या दरम्यान शहाजीराजांनी मुर्तुजा निजामाला गादीवर बसवून येथूनच कारभार चालविला. त्यामुळे जिजाबार्इंच्या रूपाने छत्रपतींचे वास्तव्य परंड्यात राहिले होते. अहमदनगरच्या निजामशाहीच्या काळातच येथील २६ बुरुजांवर विविध तोफा ठेवण्यात आल्या. यापैकी मलिक- इ-मैदान, कसाब, खडक अझदहपैकर या महत्त्वाच्या तोफा असून आज भारतातील नावाजलेली विजापूरच्या सर्जा बुरुजावरील मुलुखमैदान (मलिक-इ-मैदान) तोफ १६३२ पर्यंत परंड्याच्या बुरुजावर होती. साधारणपणे २२ मे १६३२ ला विजापूरच्या आदिलशहाचा दिवाण मुरार जगदेवने १० हत्ती आणि ४०० बैलांच्या साह्याने ५५ टन वजनाची ही तोफ विजापूरला नेली. त्यापूर्वी नगरचा दिवाण मलिक अंबरने सोलापूरवर तिचा वापर केला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ मे इ.स.१६७३
इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) टॉमस निकल्स याने युवराज शंभुराजेंना भेटण्याची परवानगी मिळाली. महाराज गडावर नसल्यामुळे टॉमस निकल्सने युवराज शंभुराजेंना भेटण्याची परवानगी मागितली. ती लगेच दिली गेली. पण खुप पाऊस पडत असल्याने टॉमस निकल्स किल्ले रायगडावर इच्छा असूनही जाऊ शकला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ मे इ.स.१६७४
( वैशाख वद्य द्वादशी, शके १५९६, संवत्सर आनंद, शुक्रवार )
हेंन्री आक्झेंडेन किल्ले रायगडावर दाखल !
कालच शिवाजीराजे महाराज प्रतापगडावरून परतल्याचे कळताच हेन्री पुन्हा शिवरायांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील झाला. गड चढून यावे असा हुकूम मिळाला. बलदंड रायगडची अभेद्यता, मजबुती, आणि खडा गड जिंकणे अशक्यप्राय का असते याची प्रचिती त्याला आली. एक प्रहरानंतर तो रायगडावर पोहोचला. हेनरी आॕक्झीडेन सांगतो कि गडफितुरीखेरीज अभेद्य असुन राजमहाल, दरबार, प्रधानांची घरे मिळून ३०० इमारती आहेत. याची नोंद घेता शिवरायांना राजधानी म्हणून निर्माण "रायगडनगर" करायचे होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ मे इ.स.१६८१
(ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार रविवार)
गोव्याच्या गव्हर्नरचे अधिकृत वकील पाठविण्याविषयक पत्र!
गोव्याचा गव्हर्नर आंतोनियू पाईश द सांद याने डिचोलीचे हवालदार संभाजी अनंत यांस १ पत्र लिहिले असून मागे रामजी ठाकुर नावाच्या वकील म्हणवणाऱ्याबाबत जी फसवणूक झाली ती पुन्हा होऊ नये. म्हणून त्याने हे पत्र लिहिले असून त्यात तो लिहीतो की, मी गोव्याबाहेर असल्याकारणाने छत्रपती संभाजी महाराजांच्या वकीलाबाबत माझ्या हवालदाराने जे पत्र मला पाठविले त्याचे उत्तर मी तुम्हास पाठवू शकलो नाही. आपण सांगता त्याप्रमाणे आपल्या वकिलाजवळ अधिकृत कागदपत्रे नसतील तर प्रस्तुत वकिलाशी मला राजनैतिक बोलणी करता येणार नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांकडून त्याने बोलणी करण्यासंबंधी अधिकृत कागदपत्रे, दस्त आणावयास हवेत, मागे रामजी ठाकुर यांच्या बाबतीत जे घडले ते पुन्हा घडावयास नको. या सर्व गोष्टीची पुर्तता झाली की मला कळविणे त्यानंतर मी माझे अधिकृत आज्ञापत्र पाठवेन.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ मे इ.स.१६८४
औरंगजेबास सिकंदर अदिलशहाने लिहीलेल्या पत्राचा सारांश!
दिलेरखानाने घेतलेला ऐवज परत मिळावा. सर्जाखानाला घालविले म्हणजे तो छत्रपती संभाजी महाराजांस मिळेल. त्याऐवजी त्याला क्षमा करावी. उलट त्याला फौज देऊन मराठ्यांचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पारिपत्य करण्यास त्याला वापरू. सर्जाखानाचे जहागिरीचा मुलुख आपल्याकडे आला आहे तो सांगोला व मंगळवेढा इ. परत द्यावा. शहजादा व त्याच्या सरदारांनी केलेली ठाणी उठवावी. माझे मुलुखातील वसूल मला द्यावा म्हणजे मी मराठ्यांचे पारिपत्य करेन. पातशहांनी आपल्या फौजा आपल्या मुलुखात चाकणकडच्या बाजूकडून शत्रूवर सोडाव्यात. छत्रपती संभाजी महाराजांकडे माझा गेलेला मुलुख मला देण्यात यावा. छत्रपती संभाजी महाराजांचे पारिपत्य केल्यावर माझ्या मुलुखात कोणतीही लढाई होऊ नये. छत्रपती संभाजी महाराज शरण आल्यावर माझा त्यांच्याकडे गेलेला मुलुख मी त्यांचा घेतलेला मुलुख परत करून त्यांच्याशी सख्य ठेवता येईल".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ मे इ.स.१६९४
'झुल्फिकारखान' याने "जिंजीचा" आजुबाजूचा प्रदेश काबिज करण्यास सुरवात केली, कित्येक लहान-मोठी स्थळे त्याने घेतली. "त्रिचनापल्लीचा नायक" व "तंजावरचा शहाजी" यांचा खानापुढे 'निरुपाय' होवून ते खानास शरण गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ मे इ.स.१६९९
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात कर्नाटक युद्धप्रसंगी वीरमरण प्राप्त झालेले मराठा सरदार विठोजी घोरपडे यांचे पुत्र उदाजी घोरपडे यांना हिम्मतबहाद्दर ही पदवी देऊन मानाची वस्त्रे देऊन सरदारकी बहाल केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ मे इ.स.१७३९
एप्रिल १७३९ मध्ये श्रीमंत बाजीराव पाटसला असतानाच उत्तरेतून खबरगीर तातडीने दाखल झाले. इराणचा नादिरशहा खैबरखिंडीतून थेट दिल्लीवर आक्रमण करण्याच्या बेतात होता. बाजीरावांनी सातारला स्वार पाठवून शाहूमहाराजांची परवानगी घेतली आणि आपल्या फौजेला तयार करण्याचा हुकूम शनिवारवाड्यावर पाठवला. फौज तयार झाली. श्रीमंत बाजीरावांनी आपल्या स्वारांना पुढे पाठवून सर्व राजपूत व बुंदेले, जाट इत्यादी सरदारांना तयार राहण्यास सांगितले. याच वेळेचा फायदा घेऊन थेट दिल्ली हस्तगत करावी असा बाजीरावांचा डाव होता. परंतु, सैन्याची जमवाजमव होऊन सैन्य बाहेर पडेपर्यंत इकडे नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण केले. परंतु, दिल्लीत आल्यानंतर सगळ्या राजपूतांनी युद्धाची जय्यत तयारी ठेवलेली असून ते बाजीरावांच्या येण्याचीच वाट पाहात आहेत, हे नादिरशहाला समजले. त्याच्या तोंडचे पाणीच पळाले. घाईघाईने आपल्या मर्जीतल्या महंमदशहाला दिल्लीच्या तख्तावर बसवून नादिरशहा इराणला निघून (पळून!) गेला. बाजीरावांना फार वाईट वाटले. वास्तविक यावेळेस दिल्ली जिंकता येऊ शकली असती. आता काही करता येत नव्हतं. इथून तिथून सारे बादशहा सारखेच! बाजीरावांनी केवळ उपचार म्हणून नवीन बादशहाला अभिनंदनाचा खलिता आणि नजराणा पाठवला. बादशहानेही कृपा म्हणून मानाचा पोषाख, संपूर्ण सुवर्णालंकारांनी मढवलेला घोडा व हत्ती आणि पूर्वीचे सारे अधिकार कायम ठेवले. हे शाही फर्मान स्वीकारण्यासाठी बाजीरावांना दि. २२ मे १७३९ रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर उर्फ जैनाबाद येथे जावे लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment