ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 १९ मे इ.स.१५२०
रायचूरची लढाई
विजयनगर सम्राट कृष्णदेवराय आणि विजापूरचा इस्माईल आदिलशाह यांच्यात रायचूर येथे युद्ध, यात आदिलशहाचा सपाटून पराभव.
विजयनगर साम्राज्याचे प्रचंड लष्करी सामर्थ्य आणि उत्कृष्ट नेतृत्व याचे प्रतीक म्हणजे रायचूरची लढाई. शत्रूचेही डोळे दिपावेत इतके प्रचंड लष्कर राजधानीतून लढाईसाठी बाहेर पडले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇
📜 १९ मे इ.स.१६६६
(वैशाख वद्य एकादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)
महाराजांची सुटकेसाठी वेगळी खेळी!
महाराजांना आपल्या सुटकेची कुठलिही शक्यता दिसून येत नव्हती. महाराजांनी एक वेगळीच खेळी खेळायला सुरुवात केली. त्यांनी शहरातील अमीर उमराव, आधिकारी, हिंदु सरदार, मंत्री, व्यापारी यांना भेटून आपल्या विषयी जनमत तयार करण्यास सुरुवात केली. मात्र, आपल्या नजरबाजांमार्फत आग्र्याच्या दरबारात काय घडते याची चाचपणी सुद्धा सुरू केली. औरंगजेब बादशहाचा वजीर जाफरखान याने महाराजांचा अर्ज औरंगजेब बादशहाला सादर केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇
📜 १९ मे इ.स.१६७३
शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग
""पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंढी करून चाराल.
नाहीसें जालें म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील कोण्ही कुणब्याचे थील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत, तेहि जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल, की मोगल मुलकांत आले त्याहुनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल! रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही. हाली उनाळ्याला आहे . कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील. आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. ''
शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये.
शेतकऱ्यांच्या काडीलादेखील हात लावू नये; अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.
शिवरायांनी शेतकरी कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇
📜 १९ मे इ.स.१६७३
इंग्रजांचा वकील टाॅमस निकल्स महाराजांना भेटण्यास किल्ले रायगडाकडे रवाना!
सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी हुबळीला इंग्रजांची वखार लुटली. त्यामुळे इंग्रज फार चिडले आणि त्यांनी महाराजांचे मालवाहू व्यापारी गलबत मस्कतहून राजापुरला चालले होते, ते लुटले आणि महाराजांकडे आपले हुबळीच्या लुटीची नुकसान भरपाई करण्याची मागणी करण्यासाठी, "वाघजी दलाल" हा वकील पाठविण्याचे ठरले. पण पुन्हा विचार बदलून आपलाच इंग्रज वकील निकल्स याला शामजी नावाचा एक व्यापारी व ३७, सदतीस अन्य व्यक्ती बरोबर देऊन पाठविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇
📜 १९ मे इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराज रायगडहून प्रतापगडास १६ मे आले. प्रतापगड येथे ते ३ दिवस राहिले आणि त्या दरम्यान त्यांनी तेथील विराजमान झालेल्या आदिशक्ति तुळजा भवानीस सव्वा मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले आणि मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित करून राजाभिषेकाआधी देवीचा आशीर्वाद घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१९ मे इ. स. १६७४
( वैशाख वद्य नवमी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार मंगळवार, ) रोजी इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री आक्झेंडन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे मुक्कामी!
विजापुरकर, जंजिरेकर, पोर्तुगीज यांना स्वपराक्रमाने महाराजांनी वठणीवर आणलेले होते. महाराजांच्या महापराक्रमाने धास्तावलेले तहाची बोलणी करण्यासाठी विजापुरकरांचे अनेक वकील महाराजांकडे येऊ लागले होते. जंजिरेकर सिद्दीही इंग्रजांच्या मध्यस्थीने तहाची याचना करीत होता. पोर्तुगीज महाराजांच्या संभाव्य आक्रमणामुळे विलक्षण धास्तावलेले होते आणि इंग्रजांनी तहासाठी हेन्री आॅक्झेडन यांस नजराणा देऊन राज्याभिषेकाच्या मुहुर्तावर किल्ले रायगडी रवाना केले होते. हेन्री आॅक्झेंडन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे पोहोचला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment