ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
📜 ४ जून इ.स.१६५७
(आषाढ शुद्ध त्रृतीया, शके १५७९)
अहमदनगरवर मराठ्यांचा हल्ला!
मोगली सैन्य जुन्नरकडे जमा होऊ लागलेले पहाताच महाराजांनी अहमदनगरवर हल्ला चढविला. नौसीरखान तातडीने महाराजांवर चालून आला. अहमदनगरला मात्र महाराज व नौसीरखानाची लढाई जुंपली. यात मोगलांचा जोर जास्त होता. त्यामुळे अनेक मावळे मारले गेले. काही जखमी झाले. तेव्हा महाराजांनी पाय मागे घेतला. तरीही महाराजांनी मोगलांचे ७०० घोडे व काही हत्ती पाडाव करून नेलेच.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ जून इ.स.१६७४
(ज्येष्ठ शुद्ध एकादशी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार गुरुवार)
राज्याभिषेक विधींना सुरूवात!
रात्री निऋर्तियाग झाला, या यागात इतर यागद्रव्यांसोबत पक्व व अपक्व मांस, मत्स्य व सुरा यांचेही बलिदान झाले. कृष्णवस्त्र धारण करून हा विधी केला. कृष्ण पुष्प गंधानेच पुजा केली. हा विधी आटोपल्यावर शुभ्र वस्त्र परिधान करून पुण्याहवाचन झाले. गोदान दक्षिणा होऊन त्यादिवशीचा सोहळा आटोपला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ जून इ.स.१६८१
पोर्तुगीज व्हॉईसराय आंतनियू प्राईज द सादे यांनी आण्णाजी पंडीत यांस लिहीलेल्या पत्राची नोंद!
"आपले दिवंगत स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण मोठ्या चातुर्याने इमाने इतबारे राज्य कारभार हाकण्यास मदत करीत होता हे मला माहित होते. त्याच भक्तीने आपण त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचीही सेवा करीत आहात असे कळले आहे. परंतु मला असे कळले आहे की, आपल्या राज्याचा सांप्रतचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारासारखा चालत नसावा. छत्रपती संभाजी महाराज यांना सल्ला द्यावा की, तुम्ही पोर्तुगिजांवर विश्वास टाकावा व शत्रूशी निर्धास्तपणे मुकाबला करावा. आमच्या स्वामींच्या राज्याला त्यांच्या राज्याची सीमा भिडलेली आहे. तिचे रक्षण करण्यासाठी यांना एकही शिपायाची गरज नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ जून इ.स.१६९१
छत्रपती राजाराम महाराजांची दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा - राजाराम महाराजांची सनद
औरंगजेबाच्या स्वारीच्या आत्यंतिक संकटकाळात राजाराम महाराजांनी हिंमत तर हरवली नाहीच, उलट दक्षिण जिंकून बादशाहीची उत्तरेतील दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगली. त्या विषयीची राजाराम महाराजांची ही अस्सल सनद ( ४ जून १६९१ )
' वजारतमाब राजेश्री हणमंतराव घोरपडे गोसावी अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजेश्री - प्रति राजाराम छत्रपती उपरी. तुमचे विशई राजश्री नागोजी माने येही विनंती केली. तुमचा मुद्दा स्वामींच्या राज्यात यावयाचा आहे. स्वामीने त्याज योग्य भाग्य ( सरंजाम) दिधलिया त्या प्रांती राजश्री रामचंद्रपंत अमात्य याजकडे येतील म्हणौन विदीत केले. त्यावरून तुमचा मनोदेये कलला, की #महाराष्ट्रधर्म पूर्ण रक्षावा यैसा कलप ( कल्प) स्वामींनी जाणून तुम्हावरी (व) राजश्री कृस्णाजी घोरपडे उभयतास भाग्ये होन प्रमाणे ( पादशाही) ६००००० सहा लाख दिल्हे आहे. खासा तुम्हास भाग्य होन ५००००० पाच लाख व कृस्णाजी घोरपडे यास भाग्य होन १००००० एक लाख
येणेप्रमाणे चालवावयाचा निश्चय करून दिधले असे. धड घोडे धड माणूस ठेऊन स्वामीसेवा करावी. यास सरंजाम द्यावयाचा तर -
खासा तुम्हास होन प्रमाणे
६२,५०० - रायगड प्रांत कबज जालिया उपरी सरंजाम
६२,५०० - विजापूर हस्तगत जाल्यावर द्यावे
६२,५०० - भागानगर घेतल्यास
६२,५०० - औरंगाबाद घेतल्यावर
२,५०,००० - दिल्ली घेतल्यावरी
________
५,००,०००
राजश्री कृस्णाजी घोरपडे
१२,५०० - रायगड प्रांत कबज जालिया उपरी
१२,५०० - विजापूर हस्तगत जाल्यावर
१२,५०० - भागानगर घेतल्यावर
१२,५०० - औरंगाबाद घेतल्यावर
५०,००० - दिल्ली घेतलेवरी
________
१,००,०००
येणेप्रमाणे सहा लक्ष होन सरंजाम करुन द्यायचा निश्चय केला आहे. नवे स्वाराचा जमाव माफिक सरंजाम करुन देऊ. येकनिस्टपणे सेवा करावी. स्वामी तुमचे बहुत प्रकारे चालवितील.'
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment